गोंदिया : जिल्ह्यात सध्या सातबारा आॅनलाईन करण्याचे काम जोरात सुरू आहे. गोंदिया वगळता सर्व तालुक्यांमधील सातबारा-फेरफार यासंबंधीची माहिती तहसील कार्यालयात जमा होऊन ती एनआयसी (जिल्हा माहिती केंद्र) कडे सादरही करण्यात आली. मात्र तरीही अनेक ठिकाणचे पटवारी आपण आॅनलाईनच्या कामात असल्याचे सांगून मूळ कामात दांड्या मारत आहेत.सर्व तालुक्यांमध्ये सातबारा आॅनलाईन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यात गोंदिया तालुका सध्या माघारला असला तरी इतर तालुक्यांच्या माहितीची सीडी सादरही झाली आहे. असे असताना गावोगावच्या पटवाऱ्यांवरील या कामाचा ताण आता बराच हलका झाला आहे. तरीही ते आपण या कामात खूप व्यस्त असल्याचे दाखवून कार्यालयातच येत नसल्याने नागरिकांना सातबारा-फेरफार मिळविण्यासाठी अनेक चकरा माराव्या लागत आहेत.तिरोडा तालुक्यात ही समस्या अधिक तीव्र असल्याचे नागरिकांनी सांगितले. काही पटवारी तहसील कार्यालयात गेल्याचे सांगतात. पण तिथेही ते हजर नसतात. त्यामुळे पटवाऱ्यांना गायब राहण्यासाठी हे एक निमित्त मिळाले आहे. आपले काम उरकावे यासाठी नागरिक पटवारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या चकरा मारत थकून गेले आहेत. मात्र पटवारी हाती लागत नसल्याने नागरिकांची कामे होत नसून चकरा फुटक जात आहेत. ज्या नागरिकांच्या सुविधेसाठी आॅनलाईनची प्रक्रिया केली जात आहे त्या नागरिकांना सध्या होत असलेला त्रास कमी करून पटवाऱ्यांना योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
आॅनलाईनच्या नावावर कर्मचारी आॅफलाईन
By admin | Updated: March 16, 2015 00:04 IST