लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : व्यक्तीच्या तोंडाच्या माध्यमातून संसर्ग त्याच्या शरीरात पसरत असल्याने मुख आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. झोपेतून उठल्यावर तोंडाची दुर्गंधी येणे सामान्य आहे. दात स्वच्छ केल्यावर दुर्गंधी बरी होते; पण जर दिवसभर तोंडाची दुर्गधी येत राहिली तर ते दातांच्या समस्येचे किंवा इतर आरोग्य स्थितीचे लक्षण असू शकते.
तोंडाचा कर्करोग : तुमच्या ओठांना, जिभेला किंवा तोंडाच्या आतील भागाला प्रभावित करू शकतो. त्याचे निदान बहुतेकदा उशिरा होते. त्यामुळे, यशस्वीरीत्या उपचार करणे कठीण होते.
गिळण्यास अडचण डिसफॅगिया) : डिसफॅगिया म्हणजे जेव्हा तुम्हाला घन आणि द्रव गिळण्यास त्रास होतो. मज्जातंतूंत किंवा स्नायूंमध्ये समस्या, अन्ननलिकेतील समस्या या परिस्थितीत डिसफॅगिया होऊ शकतो. हा थिस्ट फंगसमुळे होणारा तोंडाचा संसर्ग आहे. तोंडात राहणाऱ्या सूक्ष्म जंतूंमध्ये बदल झाल्यास ही समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी तोंड, दात हे नेहमी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.
मौखिक आरोग्य बिघडण्याची प्रमुख कारणेदात किडणे, हिरड्यांचा आजार, दातांची संवेदनशीलता, तोंडाची दुर्गंधी, तोंडाचे संक्रमण, धूम्रपान व तंबाखूचे सेवन, पोषक आहाराची कमतरता.
या आहेत समस्या
- हिरड्या आणि दातांमधून रक्तस्त्राव : हिरड्यांचे आजार, दंत प्रक्रिया किंवा दुखापतींमुळे होऊ शकते. दातांवर व हिरड्यांवर प्लाक जमा होतो तेव्हा असे होते.
- दात दुखणे : दातातील पोकळीमुळे दात किडणे, चिरलेले, तुटलेले दात, खराब झालेली फिलिंग, कैंप किंवा रोपण यामुळेसुद्धा दात दुखतात.
- तोंडातील फोड किंवा व्रण : अल्सर हा तोंडाच्या फोडाचा एक सामान्य प्रकार आहे. त्यामुळे दात घासणे, बोलणे, खाणे आणि पिणे यासारखी दैनंदिन कामे करणे अस्वस्थ होऊ शकतात. बहुतेक तोंडाचे व्रण एक किंवा दोन आठवड्यांत स्वतःहून बरे होतात.
मुख आरोग्य सुधारण्यासाठी उपाय
- नियमित दंतचिकित्सकांना भेट देणे आवश्यक.
- फ्लोराइडयुक्त टूथपेस्ट व माउथवॉशचा वापर करणे.
- व्हिटॅमिन 'बी' व 'सी'युक्त फळे व भाज्यांचा आहारात समावेश करणे.
- नैसर्गिक दात स्वच्छ करणाऱ्या सफरचंद आणि गाजराचे सेवन करणे.
- धूम्रपान व तंबाखूचे सेवन टाळणे. साखरेचे वारंवार सेवन टाळावे.
१४ दिवस तोंडाच्या आजाराकडे गांभीर्याने पाहातोंडाचे व्रण स्वतःहून बरे होतात. दात किडणे, हिरड्यांचे आजार आणि तोंडाचा संसर्ग यासारख्या दंत समस्या ओळखण्यासाठी नियमित दंतचिकित्सकांना भेट देणे.
"तोंडाच्या आजारांमुळे तुम्ही कसे खाता, कसे बोलता, कसे संवाद साधता आणि भावना व्यक्त करता. यावर, परिणाम होऊ शकतो. निरोगी तोंड असणे तुमच्या एकूण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे, दीर्घकालीन आजाराचा धोका कमी होऊ शकतो."- डॉ. अनिल आटे, दंतरोगतज्ज्ञ