शहरवासीयांना गढूळ पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 09:51 PM2018-05-19T21:51:44+5:302018-05-19T21:51:44+5:30

मागील आठवडाभरापासून शहरवासीयांना गढूळ पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

Disturbed water supply to the city dwellers | शहरवासीयांना गढूळ पाण्याचा पुरवठा

शहरवासीयांना गढूळ पाण्याचा पुरवठा

googlenewsNext
ठळक मुद्देजलशुद्धीकरण यंत्रात बिगाड : आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील आठवडाभरापासून शहरवासीयांना गढूळ पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत शहराला पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. प्राधिकरणाचे शहरात जवळपास १४ हजारावर ग्राहक आहेत. यंदा वैनगंगा नदीचे पात्र एप्रिल महिन्यात कोरडे पडले आहे. त्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होवू नये, यासाठी मजीप्राने ९० कि.मी.अंतरावरील पुजारीटोला धरणातून कालव्याव्दारे पाणी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले. त्यामुळे शहरावरील पाणी टंचाईचे संकट टळले. मात्र मागील आठवडाभरापासून शहरवासीयांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. सुरूवातीला शहरवासीयांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतर सतत गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने शहरवासीय दहशतीत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून आधीच शहरात तीव्र पाणी टंचाई आहे. त्यातच गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने शहरवासीयांवर दूरवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची पाळी आली आहे. विशेष म्हणजे शहरवासीयांना शुध्द पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी डांर्गोली पाणी पुरवठा योजनेतंर्गत कुडवा येथे जलशुध्दीकरण यंत्र लावण्यात आले आहे. मात्र यानंतरही गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात प्राधिकरणाचे १४ हजारावर ग्राहक तसेच सार्वजनिक नळ कनेक्शन आहेत. शहरातील सर्वच भागातील ग्राहकांनी मागील आठवडाभरापासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याची ओरड आहे. मात्र यानंतरही महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभाग यासर्व प्रकारावर गंभीर नसल्याची ग्राहकांची ओरड आहे.
मजीप्रा म्हणते पाईप लिकेज
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून मागील आठवडाभरापासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत शहरातील काही ग्राहकांनी या विभागाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र यावर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नेहमीचे उत्तर देत पाईप लाईन लिक झाली असेल, दुरूस्ती करुन समस्या मार्गी लावण्यात येईल हे नेहमीचे उत्तर देत याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली. त्यामुळे शनिवारी (दि.१९) ला सुध्दा शहरवासीयांना गढूळ पाण्याचा पुरवठा करण्यात आला.
अल्पावधीतच पाईप लाईन लिकेज
शहराची वाढती लोकसंख्या गृहीत धरुन शासनाने गोंदिया शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना मंजुर केले. या योजनेचे काम पूर्ण होवून केवळ दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यातच पाणी पुरवठा करण्यासाठी टाकलेली नवीन पाईप लाईन वांरवार लिकेज होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अवैध नळजोडणीचा फटका
शहरातील ग्राहकांना अवैध नळजोडणी करुन देणारी टोळी सक्रीय होती. या टोळीने शहरात ठिकठिकाणी अवैधपणे मजीप्राची पाईप लाईन खोदली. त्यामुळे गटाराचे पाणी पाईप लाईनमध्ये जात आहे. याचाच मजीप्राला फटका बसत आहे.

१८ मे ला रात्री जलशुध्दीकरण यंत्रात बिघाड आला. त्यामुळे पाणी फिल्टर झाले नाही. सध्या पुजारीटोला जलाशयातून पाणी आणून शहरवासीयांना पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाणी थोड्या प्रमाणात अशुध्द असू शकते. मात्र ही समस्या गांर्भियाने घेत जलशुध्दीकरण यंत्राची दुरूस्ती करण्यात आली आहे. शहरवासीयांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात येईल.
- राजेंद्र मडके
उपविभागीय अभियंता, मजीप्रा गोंदिया.

Web Title: Disturbed water supply to the city dwellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.