डी. बी. गावडे : मोहगाव (तिल्ली) शाळा झाली डिजिटल तिल्ली (मोहगाव) : तंत्रज्ञानयुक्त अध्यापन घेऊन, खाजगी व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांसह जगातील कोणत्याही स्पर्धेत जिल्हा परिषदेचा विद्यार्थी टिकून राहिला पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांनी केले. येथील जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेत २४ एप्रिल रोजी डिजिटल शाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती पी. जी. कटरे होते. मार्गदर्शक म्हणून शिक्षणाधिकारी उल्हास नरड तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती दिलीप चौधरी, उपसभापती सुरेंद्र बिसेन, तहसीलदार कल्याण डहाट, गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे, सरपंच सुरजलाल पटले, ग्रामपंचायत सदस्य बाबुलाल गौतम, सेवा सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष लोकराम बोपचे, तंमुस अध्यक्ष तिलकचंद बोपचे, पोलीस पाटील पुनेश कोल्हे, केंद्रप्रमुख आर. आर. अगडे उपस्थित होते. पुढे बोलताना गावडे यांनी, ग्रामीण भागातील शाळा ज्ञानरचनावाद, डिजीटलायजेशनमुळे समोर येत आहेत. कृतीयुक्त अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थी शाळेत रममाण झाले आहेत; किंबहुना विद्यार्थी शाळेला सुट्टी झाली तरी शालेय आवार परिसरातील रंगकाम व विविध तक्ते तथा साहित्याची हाताळणी करत घरी जाण्याची देखील तसदी घेत नाहीत. हे सर्व बालक-पालक-शिक्षक-अधिकारी व गावकऱ्यांचे यश असल्याचे मत व्यक्त केले. सभापती कटरे यांनी, शिक्षक व विद्यार्थ्यांसह पालक देखील आता स्मार्ट झाला पाहिजे. जिल्ह्यातील प्रत्येक मूल शिकले पाहिजे यासाठी सतत धडपड करणारे शिक्षणाधिकारी नरड यांच्यामुळे जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्रात प्रकाशझोतात आहे. शासनाने निर्देशित केलेल्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. विज्ञान युगाला तंत्रज्ञानयुक्त शिक्षणाची जोड असलीच पाहिजे. शिक्षणामध्ये कृतीयुक्त परिवर्तन घडून आलेच पाहिजे. शाळेच्या भौतिक सोयीसुविधेसाठी तत्पर असल्याचे मत व्यक्त केले. शिक्षणाधिकारी नरड यांनी, शाळेचे वातावरण तथा विद्यार्थी प्रगत करण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने डोळसपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात १०४९ शाळा रचनावादी झाल्यात, डिजीटल मोहीम जोरदार सुरू असून विद्यार्थ्यांना १०० टक्के प्रगत करणे आपली जबाबदारी आहे. संपूर्ण पगार मिळतो तर संपूर्ण मुले प्रगत झालीच पाहिजेत. यासाठी आपणा सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. येत्या दिवाळीपर्यंत आपण हे घडवून आणणार असल्याचे सांगितले. तहसिलदार डहाट यांनी, कॉन्वेंटच्या शाळेपेक्षा दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण जि. प. शाळेत मिळत आहे. सर्व गावकऱ्यांनी आपली मुले याच शाळेत शिकवावेत. जि. प. चा आताचा शिक्षक खूप उच्चशिक्षित आहे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झालाच पाहिजे असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बी. सी. वाघमारे व सरपंच पटले यांनी मांडले. संचालन शाळेतील विद्यार्थी तुलसी कटरे व उज्वल गौतम यांनी केले. आभार विद्यार्थिनी तृप्ती बहेकार हिने मानले. कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वेकचंद कोल्हे, ग्रामपंचायत कार्यकारिणी सचिव एल. डी. राऊत, उपाध्यक्ष डिलेश्वरी येळे, भोजराज पटले, हरि पटले, लिलेश गौतम, रेवालाल गौतम, गुणेश्वर कटरे, चुन्नी गौतम, अशोक चेपटे, टेकचंद भगत, अनिल मेश्राम, एल. के. ठाकरे, बी. एन. लहाने, शालिनी बोपचे, डी. सी. कोल्हे, विजया शिकारे, सर्व गावकरी, पालक, माता-पालक, प्रतिष्ठित नागरिक, युवा वर्गाने सहकार्य केले.(वार्ताहर) ग्रा.पं.ने केला सत्कारकार्यक्रमाला उपस्थित सर्व पाहुण्यांचा ग्रामपंचायत कडून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या स्थानिक निधीतून शाळेला तीन लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला. याबद्दल त्यांचे आभार मानले गेले. तर शिक्षणाधिकारी नरड यांनी शाळेतील सोयी सुविधा, वाचनकुटी आदींची पाहणी करून गावकऱ्यांशी संवादही साधला.
जि. प. शाळेचा विद्यार्थी कोणत्याही स्पर्धेत टिकावा
By admin | Updated: May 1, 2016 01:47 IST