गोंदिया : मध्यप्रदेशातील काही भागांत पावसाची संततधार सुरू असल्याने संजय सराेवर ९० टक्के भरले आहे. या धरणाची साठवण क्षमता लक्षात घेता या धरणातून सध्या १५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी गोंदिया जिल्ह्यातील बाघ नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, नदीकाठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील चोवीस तासांत संजय सरोवर धरणाचे दरवाजे केव्हाही उघडण्याची शक्यता आहे.
मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे आमगाव, सालेकसा, देवरी तालुक्यांतील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत; तर काही मार्गदेखील बंद आहेत. गुरुवारी (दि. १६) ही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे पुजारीटोला धरणाचे दोन दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले होते. संजय सरोवरमधून सध्या १५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने बाघ नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. या धरणाचे दरवाजे २४ तासांत केव्हाही उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीपातळीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. याचा गोंदिया, तिरोडा आणि सालेकसा तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना फटका बसू शकतो. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्कतेचा इशारा दिला असून यंत्रणादेखील सज्ज ठेवली आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणांत आता ६५ टक्क्यांच्या वर पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.
....................
मध्यम, लघु प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ
मागील चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मध्यम आणि लघुसिंचन प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मध्यम प्रकल्पात ५८.७ टक्के, तर लघुप्रकल्पात ६१.१५ टक्के पाणीसाठा आहे; तर ६९ मामा तलावात ६५ टक्के पाणीसाठा आहे.
.................
७०० वर घरांची पडझड
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून आतापर्यंत ७०० घरांची पडझड झाल्याची नोंद महसूल विभागाने केली आहे.
.................
प्रमुख धरणांतील पाणीसाठा
संजय सरोवर : ९० टक्के
सिरपूर : ६३.३५
कालीसरार : ९०.८२
पुजारीटोला : ९१.२९
इटियाडोह : ६२.०२ टक्के
......................................