लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना, तसेच एनसीसी स्काऊट-गाईडमधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भात शासन निर्णय पारीत करण्यात आलेला आहे.
शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय, राज्य, विभाग आणि जिल्हा पातळीवर क्रीडा प्रकारात यश मिळविल्यानंतर त्यांना दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेत ग्रेस गुण दिले जातात. यासाठी क्रीडा अधिकाऱ्यांकडे २१ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
दहावी किंवा बारावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना वाढीव क्रीडा गुण सवलत मिळते. याचा फायदा त्यांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेताना राखीव खेळाडू राखीव कोटाच्या माध्यमातून याचा फायदा खेळाडूंना घेता येतो.
किती प्रकारांत मिळतात गुण ? जिल्हास्तरावर क्रीडा व युवक सेवा संचालनालयाद्वारे आयोजित विभागीय शालेय क्रीडा स्पर्धा नेहरू हॉकी कप, सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा व केंद्र शासनाच्या क्रीडा व कल्याण विभागाच्या भारतीय खेळ प्राधिकरणाने पुरस्कृत केलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धा, स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित स्पर्धा, तसेच स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याशी संलग्न खासगी असोसिएशनमार्फत आयोजित स्पर्धात क्रमांक पटकावणाऱ्या, तसेच सहभागी खेळाडूंनाही गुण मिळतात.
८९४ अर्ज दाखलयेथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात एकूण ८९४ अर्ज दाखल झाले आहेत. त्यांना मंजूर, नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची मुदत २१ एप्रिल २०२५ पर्यंत करण्यात आली आहे.
किती गुण दिले जातात ?
- जिल्हास्तरावरील स्पर्धेत प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवलेल्या खेळाडूला पाच गुण, तर सहभागी खेळाडूला गुण दिले जात नाहीत. विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवलेल्या खेळाडूंना १० गुण, तर सहभागी असलेल्या खेळाडूंना प्रत्येकी ५ गुण दिले जातात.
- राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवलेल्या खेळाडूंना प्रत्येकी १५ गुण, तर सहभागी असलेल्या खेळाडूंना १० अथवा १२ गुण दिले जातात. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी आणि प्रथम ते तृतीय क्रमांक मिळविलेल्या खेळाडूंना २० गुण, तर सहभागी असलेल्या खेळाडूंना १५ गुण दिले जातात.
- आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पिक 5 एशियन गेम्स व कॉमनवेल्थमध्ये सहभागी असलेल्या आणि प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवलेल्या खेळाडूंना २५ गुण, तर सहभागी असलेल्या खेळाडूला २० गुण दिले जातात. तसेच खेळांच्या आंतरराष्ट्रीय फेडरेशनद्वारा आयोजित आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम ते तृतीय क्रमांक मिळविलेल्या खेळाडूंना प्रत्येकी २५ गुण, तर सहभागींना २० गुण दिले जातात.
"दहावी किंवा बारावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना वाढीव क्रीडा गुण सवलत मिळते. याचा फायदा त्यांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेताना राखीव खेळाडू कोटाच्या माध्यमातून होतो."- नंदा खुरपुडे, जिल्हा क्रीडा अधिकारी गोंदिया