गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेच्या तडाखेबंद कारवाईत एक संशयित तरुण पोलिसांच्या जाळ्यात सापडला असून, त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुलं व १० जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत. हा तरुण गोंदिया येथून बालाघाटकडे अवैध शस्त्रे घेऊन जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर ही कारवाई २७ जुलै करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक नियमित गस्त घालीत असताना त्यांना एका गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे एक व्यक्ती मोटारसायकलवरून अवैध अग्निशस्त्रे घेऊन बालाघाटकडे जात आहे. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी त्वरीत गोंदिया-बालाघाट रोड येथील मुरपार गावाजवळ नाकाबंदी लावली. रात्री ८:३० वाजता एक तरूण काळ्या बॅगसह मोटारसायकलवरून संशयास्पद हालचाली करताना पोलिसांच्या नजरेस पडला. त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने आपले नाव प्रशांत केशव सोनवणे (१८ ) रा. बारो, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर असे सांगितले. त्याची बॅग तपासून एक पिस्तुल लोखंडी, १६ सेमी बॅरल व १० सेमी मूठ किंमत ५० हजार, दुसरी पिस्तुल लोखंडी, १५ सेमी बॅरल व ८.५ सेमी मूठ किंमत ५० हजार, काडतुसे १० नग किंमत ५ हजार असा १ लाख ५ हजाराचे अवैध शस्त्र जप्त केले. या प्रकरणी रावणवाडी पोलिसात भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहेत.
यांनी केली कारवाईही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, संजय चौहान, सोमेन्द्रसिंह तुरकर, छगन विठ्ठले, राकेश इंदुरकर, योगेश रहिले, लक्ष्मण बंजार यांंनी केली आहे.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची नजर
स्थानिक गुन्हे शाखेच्या या तत्पर आणि व्यूहरचित कारवाईमुळे संभाव्य अवैध शस्त्र विक्रीचा मोठा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
ती शस्त्रे गोंदियातील की बाहेरची?आरोपी प्रशांत केशव सोनवणे (१८ ) रा. बारो, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर याच्याकडून जप्त केलेली शस्त्रे ही गोंदियातून कुणाजवळून घेतली की बोहरून तो गोंदियामार्गे बालाघाट जात आहे याची माहिती पोलीस घेत आहे. गोंदियातून ती शस्त्री बालाघाटला ऑर्डवर जात असतील तर त्या श्त्रांचा पुरवठादार कोण या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.
त्याच्या गुन्हेगारी वृत्तीची होणार चौकशी
अवैध शस्त्र घेऊन जाणाऱ्या तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. तो १८ वर्ष दोन महिन्याचाच असून घातकशस्त्र घेऊन जात असतांना तो पोलिसांनाही घाबरत नसल्याने त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याची तपासणी पोलिस करणार आहेत.