आमगाव : पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश देण्यासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या जनजागृतीसाठी नगरपरिषदेच्या वतीने शनिवारी (दि. २३) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी राज्य शासनाकडून ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत नगरपरिषदेच्या माध्यमातून निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, तर सोबतच शनिवारी (दि. २३) सायकल रॅलीही कढण्यात आली.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित ‘माझी वसुंधरा’ अभियान हे संपूर्ण राज्यात २ ऑक्टोबर ते ३१ मार्च या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत येथील नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत शहरवासीयांना ‘माझी वसुंधरा’ अभियानाबाबत माहिती व्हावी, जेणेकरून पर्यावरण संवर्धन व संरक्षणात त्यांचा हातभार लागावा, या उद्देशाने नगरपरिषदेच्या वतीने निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, शनिवारी सायकल रॅली काढण्यात आली. नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी दयाराम भोयर यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला.
पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी वाहनाऐवजी सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा, असा संदेश या रॅलीतून देण्यात आला. सायकल रॅली सकाळी गांधी चौकातून निघून भवभूती महाविद्यालयापासून परत गांधी चौकात आली. रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांना नगरपरिषदेकडून प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. याप्रसंगी क्रीडा शिक्षक विनायक अंजनकर, नगरपरिषद कर्मचारी व अन्य नागरिक सहभागी झाले होते.