लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात असून, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे लाभ दिले जातात. सर्व योजनांचे लाभ मिळविण्यासाठी बांधकाम कामगारांनी नोंदणी करणे आवश्यक असते. नोंदणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी कामगार सुविधा केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या सुविधा केंद्रातून कामगार नोंदणी करू शकतील.
केंद्र शासनाने इमारत, इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा, आरोग्य आणि कल्याणकारी उपाययोजनांच्या तरतुदीसाठी पारीत केलेल्या इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम १९९६ अंतर्गत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नियम २००७ अधिसूचित केले होते. त्या अंतर्गत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची शासन अधिसूचना कामगार विभागाची ४ ऑगस्ट २००७ अन्वये स्थापना करण्यात आली आहे.
बांधकाम कामगार नोंदणीचे निकष
- बांधकाम कामगार नोंदणीसाठी कामगाराचे वय १८ ते ६० असावे, मागील वर्षभरात २० दिवसांपेक्षा अधिक दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.
- आधारकार्ड (रहिवासी, ओळखपत्र पुरावा, वयाचा पुरावा) म्हणून ग्राह्य धरले जाईल. प्रतिवर्षासाठी नोंदणी शुल्क १ रुपया, तर नूतनीकरणासाठी १ रुपया शुल्क आकारणी केली जाते.
सुविधा केंद्र झाले सुरू
- बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, लाभासाठी अर्ज भरणे, अपडेट करणे इत्यादी काम करण्यासाठी कामगार सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
- दरम्यान, शासनाकडून बांधकाम कामगारांना विविध सोयी- सुविधा देण्यात येतात. त्यासाठी मात्र संबंधित कामगाराची रीतसर नोंदणी कामगार सुविधा केंद्रात असणे आवश्यक आहे.
- राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचाचे वाटप करण्यात आले आहे.