न्यायाधीश गिरटकर यांचे प्रतिपादन : कायदेविषयक साक्षरता शिबीरगोंदिया : जनतेच्या हिताच्या दृष्टीने प्रचिलत कायद्यांमध्ये वेळोवेळी परिवर्तन केल्या जाते. कायद्यातील होणारे परिवर्तन सर्वसामान्य जनतेपर्यत पोहोचणे गरजेचे आहे. न्यायालयात फक्त शिक्षाच दिली जात नाही तर फौजदारी प्रक्रि या संहितेच्या कलम ३५७ अंतर्गत पिडित व्यक्ती किंवा बळी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना सांत्वनेच्या स्वरूपात नुकसानभरपाई दिली जाते, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एम.जी. गिरटकर यांनी केले. पोलिस मुख्यालय कारंजा येथे नुकतेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय गोंदिया ,जिल्हा वकील संघ आणि पोलिस विभाग गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक साक्षरता शिबिरात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सविता बेदरकर, सहाय्यक सरकारी वकील अॅड. पी.एस.आगाशे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. टी.बी.कटरे, उपशिक्षणाधिकारी राजन घरडे उपस्थित होते. न्या. गिरटकर पुढे म्हणाले, प्रत्येक सुजाण नागरिकांनी कायद्याचे प्राथमिक ज्ञान ठेवणे गरजेचे आहे. दुचाकी,चारचाकी वाहने, वापरणा-या व्यक्तींनी त्यांचा वाहनाचा विमा काढावा अन्यथा त्यांच्या वाहनाने अपघात झाला व त्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पिडी व्यक्तीला देण्यात येणारी नुकसान भरपाई ही वाहन मालकाला द्यावी लागते. म्हणून कायदेविषयक ज्ञान असणे आवश्यक आहे. विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समित्यांना विविध योजना राबविण्यात येत आहेत. मोफत विधी सेवा व सहाय्य योजनेंतर्गत न्यायालयात प्रकरण दाखल करण्याकरीता प्रकरणासंबंधीत सर्व खर्च देणे, प्रकरणात वकीलांची मोफत नेमणूक करणे, प्रत्येक व्यक्तीला विधी सेवा मिळण्याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर विधी दक्षता व सहाय्यक केंद्रामार्फत मोफत विधी सेवा पुरविणे, कोणत्याही नागरिकांना कायदेविषयक अडचणी येत असतील तर पॅरा-लिगल व्हॉलेटीयर्स मार्फत त्यांना मदत करणे, लोकअदालत मध्यस्थी योजना राबविण्यात येत आहे. नागरिक, महिला,दुर्बल घटकातील व्यक्ति, बालक, व पिडितांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. डॉ. भूजबळ म्हणाले, सर्व शासकिय विभाग, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, सुजाण नागरिक, या सर्वानी योग्य समन्वय साधल्यास कोणतीही व्यक्ती न्यायापासून वंचित राहणार नाही. प्रा. सविता बेदरकर म्हणाल्या, ज्या महिलांना कायद्याचे ज्ञान नसते त्या महिलांवर अत्याचार होतात म्हणून महिलांनी आपल्या अधिकारांची जाणीव असणे व महिला संरक्षक विषयक कायद्यांचे ज्ञान असणे गरजेचे असल्याचे सांगितले. अॅड. आगाशे यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांनी कार्यान्वित केलेल्या ७ योजनांबाबतची माहिती दिली. कार्यक्रमाला न्या. सागर इंगळे, न्या.खंडारे, न्या.वासंती माहुले, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते. पोलिस निरीक्षक दिनेश शुक्ला, पोलिस उपनिरिक्षक कुथे, पोलिस अधिकारी व कर्मचारी, पोलिस मित्र पॅरा-लिगल व्हालेंटिअर्स मोठया संख्येत उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा विकल संघाचे अध्यक्ष अॅड. टी.बी.कटरे, संचालन अॅड. शबाना अंसारी तर आभार बरकते यांनी मानले.यशस्वीतेसाठी विधी सेवा प्राधिकरणचे आर.जी.बोरिकर, एम. पी. पटले, शिवदास थोरात, पोलिस कल्याण शाखेचे राज वैद्य, सुनिल मेश्राम,सागर घोडे, पंकज पांडे, राजेश पटले यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
न्यायालयातून मिळते सांत्वना
By admin | Updated: September 1, 2016 00:25 IST