लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कर्णकर्कश आवाज करीत दुचाकीवरून 'धूम स्टाइल' ने दुचाकी चालविण्याचे फॅड सध्या युवकांमध्ये दिसून येत आहे. नागरिकांना अशा आवाजाचा त्रास होत असल्यामुळे अशा बिघडविलेल्या सायलेन्सरवर अनेक ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. अशा दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठांमधून होत आहे. शहरात सध्या प्रत्येकच भागात अशा फाटलेल्या सायलेन्सरची वाहने सर्रास धावताना दिसत आहे. काही भागात रात्री असे तरुणांचे टोळके निघत आहेत.
दुचाकीला कंपनीने बसविलेले सायलेन्सर काढून त्या जागी मॉडीफाय सायलेन्सर बसवून फटाक्यांचा आवाज करणाऱ्या सायलेन्सरचा आवाज करत फिरताना रोडरोमिओ दिसत आहेत. अशा वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
काही ठिकाणी असतो रोड रोमिओंचा वावरशहरातील रहिवासी भागांसह शाळा-महाविद्यालय परिसरात ते सुटण्याच्या वेळी मोठ्या प्रमाणात रोडरोमिओ फिरताना दिसून येतात. त्यांच्यावर वचक बसायला हवा. यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे.
प्रबोधनाची गरजशाळा - महाविद्यालये, दवाखाने आदी ठिकाणी हॉर्न वाजविण्यास बंदी आहे. मात्र, याची माहिती वाहनचालकांना नसावी, अशी स्थिती आहे. या सर्व ठिकाणांपासून कर्कश हॉर्न व फटाका सायलेन्सर वाजवीत भरधाव जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी जागरूक नागरिक करीत आहेत. कर्णकर्कश हॉर्न या विषयाबाबत जागृती करण्यासाठी सामाजिक व स्वयंसेवी संघटनांसह, परिवहन खात्याने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
शांततेच्या ठिकाणी ध्वनिप्रदूषण....कंपनीद्वारे दुचाकीला असलेले सायलेन्सर काढून मॉडिफाय केलेले, कानठळ्या बसविणारे सायलेन्सर आढळून आल्यास त्या वाहनांवर योग्य ती कार्यवाही करावी.
मॉडिफाय केलेलेसायलेन्सर लावून मोठ्ठा आवाज करीत फिरणारे दुचाकीस्वार नियमांचे उल्लंघन करीत रुग्णालय, शाळा-महाविद्यालय तसेच शांततेच्या ठिकाणी ध्वनिप्रदूषण करीत आहेत.