लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा पोलिस दलाची नवीन वेबसाइट कार्यान्वित करण्यात आली आहे. या वेबसाइटवर जिल्हा पोलिस दलाची अद्ययावत माहिती, तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे व शाखांची माहिती अद्ययावत उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांना पोलिस विभागाशी संबंधित कामाकरिता आवश्यक असणारी माहिती याद्वारे मिळणार आहे. ही वेबसाइट पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना या वेबसाइटवर 'सिटिझन कॉर्नर' या टॅबमध्ये प्रथमच ऑनलाइन कंप्लेट ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेविषयी तक्रार करण्याकरिता यावर केलेल्या तक्रारीवर संबंधित पोलिस ठाण्याकडून कारवाई केली जाणार आहे. त्यासोबतच कोणत्या नागरिकाने काय तक्रार केली, त्या तक्रारीवर संबंधित पोलिस ठाण्याने काय कारवाई केली, हे थेट पोलिस अधीक्षकांना समजणार आहे. ते याबाबत नियमित आढावा घेणार आहेत.
या तक्रारी करता येणारनागरिकांना वेबसाइटवर महिलांविषयी तक्रार, मुलांविषयी तक्रार, गुन्हे विषयक तक्रार, आर्थिक फसवणुकीची तक्रार, सायबर गुन्हे विषयी तक्रार, संपत्ती विषयी तक्रार, मोबाइल हरविल्याची तक्रार, सायबर फसवणूक झाल्याची तक्रार, तसेच भाडेकरूची माहिती व इतर तक्रारी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
"जिल्ह्यातील नागरिकांना ऑनलाइन तक्रार करता यावी यासाठी जिल्हा पोलिस नवीन वेबसाइटचा जास्तीत जास्त वापर करावा. आपल्या तक्रारीचे निरसन करून घ्यावे. जिल्हा पोलिस दल जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता, सेवेकरिता सदैव तत्पर आहे."- गोरख भामरे, पोलिस अधीक्षक, गोंदिया.