गोंदिया : गोंदिया नगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये पाणी, रस्ते, नाल्यासह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परंतु या प्रकाराकडे चारपैकी कोणत्याही नगरसेवकाचे लक्ष नसल्याचा आरोप प्रभागवासीयांनी केला आहे.वीज, रस्ते, नाल्या या समस्या प्रभाग एकमधील नागरिकांना नेहमीच भेडसावत आहेत. मनोहरभाई वार्डातील जे.एम. शाळेच्या मार्गावरील पाईपलाईन फुटली आहे. तेथे मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे. मात्र ही पाईपलाईन दुरूस्त करण्याची तसदी कोणत्याही संबंधित अधिकाऱ्याने घेतली नाही. या फुटलेल्या पाईप लाईनजवळील रस्ताही मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे. शहरवासीयांना या मार्गावरून ये-जा करण्यास मोठीच अडचण निर्माण होते. येथे अपघाताची नेहमीच शक्यता असते. मात्र बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे रस्त्याही स्थिती ‘जैसे थे’ आहे. बी.एम. पटेल वॉर्डातील कन्हारटोली परिसरातील रिंग रोडलगत मोठ्या प्रमाणात केरकचरा जमा झाला आहे. प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिक पॉलिथिन व थर्माकोलच्या तुकड्यांनी या रस्त्याखालील जागा व्यापलेली आहे. येथे सरपटणाऱ्या जीव-जंतूंचा वास आहे. त्यामुळे कधीही धोका उद्भवू शकतो. या प्रकाराचे गांभीर्य ओळखून उपाययोजना करण्यासाठी शासन व प्रशासन दोन्ही अपयशी ठरल्याचे दिसून येते. प्रभाग-१ च्या रिंगरोडवरील चौरागडे चौकातील रस्ते उडलेले आहेत. पावसाचे पाणी तेथे साचून चिखल तयार झाले आहे. रस्त्यावरून वाहन जातेवेळी खड्ड्यांमध्ये साचलेले घाण पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडल्याशिवाय राहत नाही. रस्ते, पाणी, वीज आदी समस्यांमुळे प्रभाग-१ मधील नागरिक त्रस्त होवून गेले आहेत. मात्र लोकप्रतिनिधी व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रभागाची अधिकच दुरवस्था होत आहे. या प्रभागाच्या समस्या सोडवून नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावे. विद्युत पुरवठा २४ तास अखंडित सुरू रहावा. पिण्याचे शुद्ध पाणी नियमित मिळावे. फुटलेली पाईपलाईन त्वरीत दुरूस्त करण्यात यावी, प्रभागास कचरा व घाणमुक्त करण्यात यावे, अशी मागणी मित्र मंडळ, संयोजक मंडळ, मोहल्ला समिती तसेच कार्यकर्ते गणेश डोये, अमोल कावळे, बबलू पटेल आदी प्रभागवासीयांनी केली आहे. (प्रतिनिधी)
प्रभाग एकमधील नागरिक विविध समस्यांच्या विळख्यात
By admin | Updated: August 13, 2014 23:56 IST