लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : जगात त्याच व्यक्ती महापुरुष ठरतात ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा जनतेच्या मनावर उमटवला. छत्रपती शिवाजी महाराजांना जीवाला जीव देणाऱ्या माणसांची साथ होती. विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे स्मरण करून प्रथम आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले पाहिजे. नाते जपा, जीवाला जीव द्या, ही शिकवण आपणाला महाराजांकडून मिळते. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी राजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं, असे प्रतिपादन प्राचार्य वीना नानोटी यांनी केले.
सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा, सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेंट, जीएमबी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी पाहुणे म्हणून पर्यवेक्षिका छाया घाटे, मुख्याध्यापक हरिदास गहाणे, प्रा. यादव बुरडे, प्रा. टी. एस. बीसेन, जुगलकिशोर राठी, संजय बंगळे उपस्थित होते. कार्यक्रमात प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते देवी सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी घाटे, राठी, विष्णू चाचेरे, प्रा. जे. डी. पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रेरक प्रसंगांना उजाळा दिला. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत महाराजांच्या जीवनातील ‘गड आला पण सिंह गेला’, ‘धन्य धन्य शिवाजी शूर (पोवाडा)’, ‘अफजल खानाचा वध’, ‘शाहिस्तेखानाची फजिती’ आदी प्रसंगाचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
सूत्रसंचालन ज्ञानेश्वर रोकडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा. इंद्रनील काशिवार, सांस्कृतिक प्रमुख कुंडलिक लोथे, सुजित जक्कुलवार, नंदा लाडसे, लोपामुद्रा क्षीरसागर, विष्णू चाचेरे, धनश्री चाचेरे, ज्योती झलके, विनाश मेश्राम, होमराज गजबे, भाग्यश्री सिडाम, महेश पालीवाल यांनी सहकार्य केले.