गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून मागील तीन दिवसापासून दररोज पाचशेच्या वर रुग्णांची नोंद होत आहे. कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने फुगत असल्याने जिल्हावासीयांसाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. अन्यथा थोडेही दुर्लक्ष कोरोनाच्या विस्फाेटास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शुक्रवारी (दि.९) जिल्ह्यात चार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला तर ६६३ नवीन रुग्णांची भर पडली. उपचार घेत असलेल्या २७ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या चार रुग्णांमध्ये दोन गोंदिया तालुक्यातील, १ गोरेगाव आणि सालेकसा तालुक्यातील १ रुग्णांचा समावेश असून हे सर्व रुग्ण ५२ ते ६५ वर्षे वयोगटातील आहे. यासर्व रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होता. जिल्ह्यात बाधित आणि मृतांची संख्या दररोज वाढत असल्याने जिल्हावासीयांच्या काळजीत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच दक्ष होत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ११३७१२ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ९७५५८ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत १००४६४ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ९१५११ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १९४५९ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १५७८४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ३४३४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १६५२ स्वॅब नमुन्याचा अहवाल प्रलबिंत आहे. २५३१ रुग्ण गृहविलगीकरणात असून उर्वरित रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत.
..................
९ दिवसात ३३९९ रुग्ण आणि १७ बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यात १ ते ९ एप्रिल या कालावधीत ३३९९ कोरोना बाधितांची नोंद झाली असून १७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. ९ दिवसांच्या कालावधीत तब्बल साडेतीन हजार रुग्ण वाढल्याने जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर यांचा नियमित वापर करुन गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याची गरज आहे.
..................
कोरोना रुग्ण बरे हाेण्याचा दर ८५.७९ टक्के
जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख दररोज उंचावत आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाची सुध्दा चिंता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुध्दा स्वत:ची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा कोरोना विस्फोटास तेच कारणीभूत ठरु शकतात. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ८५.७९ टक्के आहे.
..............