लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया रद्द व्हावी या मागणीसाठी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर असोसिएशनच्या वतीने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद गोंदिया यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना निवेदन पाठविण्यात आले.
गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त आहे तसेच जिल्ह्यातील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालय ग्रामीण व दुर्गम भागात मोडतात. त्यामुळे प्रवेशाच्या वेळी पालक व विद्यार्थ्यांना अनेक अडचणी निर्माण होतील. अनेक विद्यार्थी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे प्रवेशापासून वंचित राहतील. विषय आणि माध्यमानुसार प्रवेशामध्ये असंतुलन निर्माण होऊन विज्ञान शाखा व इंग्रजी माध्यमाच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना प्राधान्य दिले जाईल व मराठी माध्यमाच्या कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या कमी होईल. त्यामुळे कला व वाणिज्य शाखेतील असंख्य शिक्षक अतिरिक्त होतील, प्रवेश प्रक्रिया वेळखाऊ व अधिक काळ चालणारी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम होईल, यासारख्या अनेक समस्या निर्माण होतील, असे निवेदनात नमूद केले आहे.
पूर्व अनुभवाच्या आधारे ज्या ज्या शहरांमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली, त्या शहरातील अनेक अनुदानित तुकड्या बंद पडल्या व शिक्षक अतिरिक्त झाले याकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे.
शिष्टमंडळात यांचा समावेशविज्युक्राच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष पवनकुमार कटरे यांनी केले. शिष्टमंडळात अरविंद शरणागत, रोमेंद्र बोरकर, जागेश्वर भेंडारकर, उपाध्यक्ष संजय कळंबे, उपाध्यक्ष सुनील लिचडे, प्रा. दिशा गेडाम, भोजराम कोरे, एम.एच.पटले, प्रा. एस.टी. पटले, धनराज मेंढे, राजकुमार बिसेन, धर्मेंद्र कुमार मेहर, जे.एन. बिसेन, प्रवीण रहांगडाले, रवी रहांगडाले, मिलिंद चौधरी, तिलक भेलावे, प्रा. वाय.एच. रहांगडाले, डी.एम. तितिरमारे, प्रेम प्रकाश हनवते यांचा समावेश होता.