गोंदिया : वेतन निश्चीती पडताळणीसाठी अडीच हजार रूपयांची लाच घेणाऱ्या लेखाधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. येथील मनोहर नगर परिषद माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील लेखा परीक्षण पथकाच्या कार्यालयात सोमवारी (दि.२४) ही कारवाई करण्यात आली. संजय रामभाऊ बोकडे (४९, रमणा मारुती बस थांब्याजवळ, नागपूर) असे लाचखोर लेखाधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार हे सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोसमतोंडी येथील लोकसेवा विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापक असून त्यांच्या विद्यालयातील परिचर भिमराव रंगारी यांचा डिसेंबर २०२४ मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या सेवा अंतर्गत आश्वासीत प्रगती योजनेच्या दुसऱ्या लाभाच्या वेतन निश्चितीची पडताळणी करण्यासाठी तक्रारदाराने बोकडे याच्याकडे कागदपत्र दिले होते. यावर त्याने वेतन निश्चितीची पडताळणी करण्यासाठी तीन हजार रूपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
तक्रारीच्या आधारे पथकाने पडताळणी केली असता बोकडे याने तडजोडीअंती अडीच हजार रूपयांची मागणी करून लाच स्वीकारण्याची तयार दर्शविली. यावर पथकाने सोमवारी (दि.२४) सापळा रचून बोकडे याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. बोकडेवर शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याच्या अंगझडतीत रोख ३५ हजार ५०० व मोबाईल मिळाला.