लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरेगाव तालुक्यातील तीन केंद्रांवर ग्रेडर आणि केंद्रप्रमुखांनी दीड कोटी रुपयांच्या धानाची अफरातफर केल्याचा प्रकार उघडकीस आला. आता याच तालुक्यातील काही शासकीय केंद्राच्या माध्यमातून शेती नसलेल्या शेतकऱ्यांची नावे बोनस मिळावा यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे याप्रकरणी पुन्हा काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
गेल्यावर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यातील महायुती सरकारने धानाला हेक्टरी २० हजार रुपये बोनस जाहीर केला. यानंतर यासंबंधीचा जीआर सुद्धा दोन दिवसांपूर्वी निघाला. बोनसचा लाभ हा शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मिळेल हे शासनाने आधीच स्पष्ट केले. यासाठी जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली तर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी ७६ हजार शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली. अर्ध्या शेतकऱ्यांनी केवळ बोनससाठी नोंदणी केल्याचे पुढे आले. विशेष म्हणजे शासनाने यावर्षी नोंदणीसाठी पोर्टलमध्ये बदल केला. सुरुवातीला ऑनलाइन नोंदणी एमईएनएल या पोर्टलवर केली जात होती. तर यावर्षीपासून ती भीम पोर्टलवर केली जात आहे. सुरुवातीला या पोर्टलमध्ये अनेक अडचणी आल्याने काही दिवस मॅन्युअल नोंदणी करण्यात आली. याचाच फायदा घेत काही शासकीय धान खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी बोगस शेतकऱ्यांच्या नावाची नोंदणी केली. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेती नाही अशा शेतकऱ्यांची सुद्धा भीम पोर्टलवर नोंदणी केली असल्याचे पुढे आले आहे. याची तक्रार सुद्धा संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे.
पोर्टलवर नावांची होणार आता पडताळणीगोरेगाव तालुक्यातील काही केंद्रावर हा प्रकार पुढे आल्यानंतर याची जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे तक्रार करण्यात आली. यानंतर विभागाने सुद्धा याची गांभीर्याने दखल घेतली असून पोर्टलवर नोंदणी केलेल्या नावाची पडताळणी केली जाणार असून त्यातील बोगस नोंदणी केलेली नावे वगळण्यात येणार आहे तसेच बोगस नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
एकाच कुटुंबातील पाच जणांची नोंदज्या शेतकऱ्याच्या नावावर शेती आहे त्याच नोंदणी केलेल्या शेतकऱ्याला बोनसचा लाभ दिला जाणार आहे. ही बाब माहिती असताना सुद्धा काही केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी एकाच कुटुंबातील पाच जणांच्या नावाची नोंदणी पोर्टलवर केली. तसेच सातबारा क्रमांक सुद्धा टाकल्याची माहिती आहे.
"पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नावांची पडताळणी केली जाणार आहे. यात ज्या बोगस नावाची नोंदणी केली असेल ती नावे वगळून अशा शेतकऱ्यांना बोनसचा लाभदेण्यात येणार नाही."- विवेक इंगळे, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी.