विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सिंचन प्रकल्प उपलब्ध असताना सुध्दा शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीवर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र तालुक्यात आहे. शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणारी बिजेपार उपसा सिंचन योजना मागील २५ वर्षापासून रखडली असल्याने शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे.बिजेपार परिसरातील शेतकऱ्यांना शेतीला सिंचनाची सोय नाही. अनेक वर्षाच्या मागणीनंतर १९९५ मध्ये युती शासनात आमगावचे तत्कालीन आमदार महादेवराव शिवणकर हे पाटबंधारे मंत्री झाले तेव्हा त्यांनी या परिसराला सिंचनाची सोय करुन देण्याचे आश्वासन दिले. नियोजनाप्रमाणे या परिसरात काही अंतरावर असलेल्या कालीसरार धरणातून उपसा सिंचन योजना मंजूर करण्याची हमी दिली. यासाठी आधी ९० टक्के आदिवासी शेतकरी असणे गरजेचे होते. ती अट रद्द शिवणकर यांनी ५० टक्के करायला लावून बिजेपार उपसा सिंचन योजनेचा मार्ग मोकळा केला. या योजनेसाठी राज्य शासनाने जवळपास दोन कोटी रुपये खर्च केले आणि पाणी उपसा करण्यासाठी पंप सुद्धा बसविण्यात आले. कालव्याचे काम सुरु झाले पण लगेच वन कायद्यात कालव्याचे काम अडकले. वन कायद्याचा अडथळा दूर करण्यासाठी प्रयत्न करुन मंजुरी आणण्याचे कामे करण्यात आली.परंतु नंतर यासाठी पुढे लागणारा निधी मिळाला नाही. १९९९ ला राज्यात सरकार बदलले आणि या योजनेकडे सपशेल दुर्लक्ष झाले. शेतकऱ्यांनी या योजनेला पूर्ण करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. आमदार, खासदारांच्या घरी अनेकदा पायपीट केली तरी सुद्धा ही योजना आतापर्यंत सुरु झाली नाही. शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे २०१२ मध्ये या योजनेसाठी काही निधी संबंधित विभागाला मिळाला परंतु विभागाने योजनेचे काम सुरु केले नाही. शेवटी निधी परत गेला आणि उपसा सिंचन योजना तशीच अर्धवट पडून राहिली. २००५ ते २००९ दरम्यान भेरसिंह नागपुरे हे आमदार असताना त्यांनी या योजनेसाठी प्रयत्न चालविले व मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला. परंतु राज्य शासनाने निधी मंजूर करुन सुद्धा योजना पूर्णत्वास आली नाही.३०० हेक्टरला सिंचनाची सोयबिजेपार उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्यास जवळपास ३०० हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होईल. त्यामुळे सुदूर क्षेत्रात राहणारे गरीब व मागास वर्गाचे शेतकरी आपल्या शेतात भरघोष पीक घेवून आर्थिक स्थिती सुधारु शकतात.गावाजळच कालीसरार धरण असून सुद्धा बिजेपार परिसरातील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. बिजेपार उपसा सिंचन योजना पूर्ण करुन शासनाने शेतकऱ्यांचे हित साधण्याची गरज आहे.- चरणदास चंद्रिकापूरे,सामाजिक कार्यकर्ता बिजेपार
२५ वर्षापासून रखडली बिजेपार उपसा सिंचन योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST
बिजेपार परिसरातील शेतकऱ्यांना शेतीला सिंचनाची सोय नाही. अनेक वर्षाच्या मागणीनंतर १९९५ मध्ये युती शासनात आमगावचे तत्कालीन आमदार महादेवराव शिवणकर हे पाटबंधारे मंत्री झाले तेव्हा त्यांनी या परिसराला सिंचनाची सोय करुन देण्याचे आश्वासन दिले.
२५ वर्षापासून रखडली बिजेपार उपसा सिंचन योजना
ठळक मुद्देवन कायद्यात अडकले कालवे । निधी आला आणि परत गेला