लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उपचार करण्याच्या नावावर लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमाला येथील विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने २९ वर्षांचा सश्रम कारावास व १.१४ लाख रुपयांचा दंड ठाेठावला. ही सुनावणी मंगळवारी (दि.१०) विशेष सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर. औटी यांनी केली आहे. मुकेश ऊर्फ लंकेश मेश्राम (वय ३५, रा. फुलचूर) असे आरोपीचे नाव आहे.१७ वर्षीय मुलीला छातीजवळ गाठ असल्यामुळे तिची प्रकृती नेहमी बिघडत होती. तिने वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार केला, परंतु त्याचा फायदा झाला नाही. म्हणून मुलीच्या आजीने बोगस डॉक्टर आरोपी मुकेश मेश्राम याच्यावर विश्वास ठेवून २७ मार्च २०१९ रोजी मुलीला तेथे घेऊन गेली. २७ मार्च २०१९ ते ५ एप्रिल २०१९ या काळात पीडित व तिच्या घरच्या सर्व लोकांना गुंगीच्या गोळ्या देऊन मेश्राम पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार करीत होता. पीडितेला व घरच्या लोकांना गुंगीच्या गोळ्या दिल्यामुळे पीडिता ही घरच्या व इतर लोकांना सांगू शकत नव्हती. ५ एप्रिल २०१९ रोजी पीडितेचे नातेवाईक (काका) बाहेरगावावरून दुपारी पीडितेच्या घरी आले, तेव्हा समोरच्या फाटकाला कुलूप दिसले. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना विचारले असता, साधारण ८ दिवसांपासून फाटक बंद असल्याचे कळले. यावरून पीडितेच्या नातेवाईकांनी फाटकाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला असता आरोपी मिळाला. आरोपीने बोगस डॉक्टर व तांत्रिक असल्याचे भासवून पीडिता व नातेवाईकांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत गुंगीचे औषध देऊन पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संदिया सोमनकर यांनी केला होता. या प्रकरणात आरोपीविरुध्द दोष सिध्द करण्यासाठी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सतीश घोडे व विशेष सरकारी वकील कृष्णा पारधी यांनी ८ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. दोन्ही पक्षांकडील वकिलांच्या युक्तिवादानंतर प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर. औटी यांनी आरोपीविरुध्द सरकारी पक्षाचा कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय अहवाल, रासायनिक परीक्षण अहवाल व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा पुरावा ग्राह्य धरून आरोपीला कलम ६ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम, २०१२ प्रमाणे २० वर्षांचा सश्रम कारावास व १ लाख रुपये दंड, दंड न भरल्यास ५ वर्षांचा अतिरिक्त सश्रम कारावास, भादंवि कलम ३२८ अंतर्गत ५ वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्षाचा अतिरिक्त सश्रम कारावास, कलम ५०६ अंतर्गत २ वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त सश्रम कारावास, कलम ३४३ अंतर्गत २ वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त सश्रम कारावास असा एकूण २९ वर्षे सश्रम कारावास व १.१४ लाख रुपये दंड ठोठावला. तसेच दंडाची रक्कम पीडितेला देण्याचे आदेश केले. तसेच मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडितेचा वैद्यकीय उपचार व पुनर्वसन करण्याचे आदेश जिल्हा विधी सेवा प्राधिकरणास दिले. न्यायालयीन कामकाजासाठी महिला पोलीस हवालदार पटले, पोलीस शिपाई रामलाल किरसान यांनी सहकार्य केले.
घरच्या सर्वांना देत होता गुंगीचे औषध - पीडितेची प्रकृती बरी नसल्याने ती सतत झोपून असल्याने आरोपी तिच्याशी अश्लील चाळे करीत होता. घरातील इतर लोकांना खोलीच्या बाहेर थांबवून खोलीत प्रवेश न करण्याची ताकीद देत होता. आरोपी हा घरच्या लोकांना व पीडितेला काळ्या रंगाच्या गुंगीच्या गोळ्या देऊन घरासमोरील फाटक बंद करून ठेवत होता व कोणालाही आत येऊ देत नव्हता.आठ दिवस दिले घरातील सर्वांनाच गुंगीचे औषध- आरोपीने आठ दिवसांपासून गुंगीच्या गोळ्या देऊन बाहेरचे फाटक लावून पीडितेवर उपचार करतो, असे भासवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. गुंगीचे औषध देऊन बलात्कार करणाऱ्या नराधमाला शिक्षा झाल्याने जिल्हावासीयांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.