गोंदिया : महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली. गोंदिया जिल्ह्यात १९ व २० सप्टेंबर या दोन दिवशी गणपती विसर्जन करण्यात येणार आहे. १९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला जिल्ह्यातील ३५० गणेशमूर्ती विसर्जन करण्यात येणार आहेत, तर २० सप्टेंबर रोजी २५० गणपती विसर्जन केले जाणार आहेत.
गणेशोत्सव शांततेत व भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. गणपती विसर्जनादरम्यान मिरवणूक काढण्यात येऊ नये, शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी गोंदिया शहर पोलिसांनी जिल्हा वाहतूक शाखेसमोरून मोटारसायकलवर रूट मार्च काढला. हा रूटमार्च गोंदिया शहराच्या विविध मार्गावरून भ्रमण करण्यात आला. गोंदिया शहरचे ठाणेदार महेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, विजय राणे यांच्यासह पोलीस ठाण्यातील ४० पोलीस कर्मचाऱ्यांनी मोटारसायकलवरून हा रूट मार्च काढला होता. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी गोंदिया पोलिसांनी गणपती विसर्जनासाठी दोन दिवस देण्यात आले आहेत.
...................
विसर्जन करताना घ्यावी काळजी
गणेशोत्सव शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे बाप्पांची मूर्ती विसर्जन सुरू झाले आहे. बाप्पांचे विसर्जन करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. सद्य:स्थितीत धरण, जलाशय, तलाव, नदी-नाले आदी ठिकाणी पाण्याची पातळी वाढली आहे. धरणाचे पाणी देखील सोडण्यात आले आहे. यादरम्यान कुणीही नागरिक, भक्तगण बाप्पांच्या मूर्तीला खोल पाण्यात घेऊन जाणे टाळावे. कुठल्याही अप्रिय घटनेला भाग पडू नये. शक्यतो घरगुती मूर्तींचे विसर्जन घरी किंवा प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम टँकमध्येच करावे. यंदा सावध राहून गणेश विसर्जन करून कुठलीही अप्रिय घटना घडू देणार नाही, असा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.
..............
प्रदूषण कायद्यातील तरतुदींचे पालन करा
गणेश मंडळांना विनापरवाना वाद्य वाजविता येणार नाही. न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे व ध्वनिप्रदूषण कायद्यातील तरतुदींचे तंतोतंत पालन करावे. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून गणेशमूर्तीच्या विर्सजनाच्या वेळी एकाच मार्गाने एका मागे एक मिरवणूक काढण्यात यावी. कोणतेही गणेश मंडळ विरुद्ध दिशेने मिरवणूक काढणार नाही. फटाके ध्वनिक्षेपक याद्वारे प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी, गणेश मंडळांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, असे पोलीस विभागाने कळविले आहे.