रावणवाडी : येथील कोकण ग्रामीण बँक शाखेत केंद्र शासनाच्या जनधन योजनेचे खाते काढणाऱ्या ग्राहकांना बँक व्यवस्थापनाकडून वेळोवेळी लादणाऱ्या जाचक अटींमुळे डोकेदुखी होत आहे. परंतु याबाबत नागरिकांनी तक्रार तरी कुठे करावी, अशी समस्या निर्माण झाली आहे.ग्राहकांच्या या समस्येचा फायदा घेत बँक व्यवस्थापक स्वयंनिर्णयाने विविध प्रकारच्या जाचक अटी लादत आहे. त्यामुळे जनधन योजनेचे बँक खाते उघडण्यास बहुतांश नागरिक उत्सुक नसल्याचे दिसून येते आहे. पंतप्रधानांनी केंद्र शासनाच्या वतीने देशातील सर्वच स्तराच्या नागरिकांचे बँक खाते असणे गरजेचे असल्याचे समजून जनधन योजनेतून विनामूल्य बँक खाते उघडण्याचे आवाहन केले. त्यानुसार बँकेने शासनाच्या बहुउद्देशिय लोकहिताच्या योजनेला मदत करणे बँकेचे दायित्व आहे. परंतु बँक व्यवस्थापकांच्या कामकाजाच्या कार्यप्रणालीमुळे सदर योजनेला खिळ बसत आहे.जनधन योजना सुरू झाल्यावेळी बँकेत खाते उघडण्यासाठी एकपानी एक साधा व सोपा अर्ज बँकेकडून पुरविण्यात येत होता. ते अर्ज भरणे सर्वच स्तरावरील नागरिकांना सुलभ जात होते. मात्र हा प्रकार काही दिवस सुरळीत चालून नंतर बंद करण्यात आला. पुन्हा तीच जुनी बँकेची पद्धत सुरू करण्यात आली. ही जुनी पद्धत किचकट व अवघड असून हे फॉर्म समजने व भरणे सर्वसामान्यांना त्रासदायक ठरत आहे. ही जुनी पद्धत सदर बँकेच्या व्यवस्थापकाने सुरू केल्याने तो फॉर्म खरेदी करण्यासाठी नागरिकांना स्टेशनशीच्या दुकानात जावून १० रूपये मोजावे लागतात. त्यानंतर ते फॉर्म भरून घेण्यासाठी दलालांना ५० ते १०० रूपये द्यावे लागतात. तसेच खाते उघडण्यासाठी ५०० रूपये भरल्यावरच खाते उघडण्यात येतील, असे व्यवस्थापकांचे फर्मान असल्यामुळे मोफत खाते कसे उघडावे अशी समस्या गोरगरीब नागरिकांसमोर उपस्थित झाली आहे. सध्या या परिसरात कोरड्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. कुटुंबातील एका व्यक्तीचे बँकेत खाते उघडण्यासाठी ६०० ते ७०० रूपयांचा खर्च येतो. आणि कोकण ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकांच्या कार्यपद्धतीमुळे बहुतांश नागरिक जनधन योजनेचे खाते उघडण्यास उत्सुकता दाखवित नसल्याचे चित्र दिसून येत आहे.आधीच या बँकेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. दरदिवशी बँकेची कामे सतत सुरू असतात. जनधन योजनेचे खाते उघडण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या कामकाजाच्या शेवटपर्यंत ताटकळत रहावे लागते. खात्याच्या नोंदीसाठी आठ-आठ दिवस लागतात, तरी पासबुक हाती येत नाही. या प्रकारामुळे जनधन योजनेंतर्गत बँक खाते उघडणाऱ्या ग्राहकांची संख्या मंदावली आहे. यासाठी संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन बँकेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणावी, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.(वार्ताहर)
बँक व्यवस्थापकाच्या अटी ग्राहकांसाठी ठरल्या डोकेदुखी
By admin | Updated: December 1, 2014 22:56 IST