अस्ताव्यस्त पार्र्किं गला लगाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2015 01:30 IST2015-10-03T01:30:23+5:302015-10-03T01:30:23+5:30
व्यापार नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया शहरातील अस्ताव्यस्त पार्किंगला आता लगाम लागत आहे.

अस्ताव्यस्त पार्र्किं गला लगाम
३५ कार उचलल्या : दोन महिन्यात १०६ वाहनांवर कारवाई
गोंदिया : व्यापार नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया शहरातील अस्ताव्यस्त पार्किंगला आता लगाम लागत आहे. पोलिस विभागातर्फे वाहतूक नियंत्रण शाखेला पहिल्यांदाच देण्यात आलेल्या दोन टोविंग व्हॅनने गेल्या २२ जुलैपासून आतापर्यंत १०६ वाहनांना उचलून नेले. यात ३५ कारचाही समावेश आहे. त्यामुळे कुठेही, कशाही कार पार्किंग करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या कारचालकांना लगाम बसला आहे.
गोंदिया शहरातील रस्ते आधीच अरूंद आहेत. त्यात अनेक व्यापाऱ्यांनी रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे. त्यातच आतापर्यंत रस्त्यावर होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीचा विचार न करता कारचालक बिनधास्तपणे रस्त्यावरच कार पार्क करून ठेवत होते.
वाहतूक नियंत्रक पोलिसांकडे आतापर्यंत कारसाठी टोविंग व्हॅन किंवा कार जॅमर उपलब्ध नसल्यामुळे ते या वाहनांवर कारवाई करीत नव्हते. केवळ दुचाकी वाहनांवरच कारवाई होत होती. मात्र आता जड चारचाकी वाहनांना उचलून वाहतूक शाखेच्या कार्यालयात नेण्यासाठी पोलिस विभागाला दोन टोविंगव्हॅन उपलब्ध झाल्या आहेत. २२ जुलै रोजी एक तर १५ सप्टेंबर रोजी दुसरी टोविंग व्हॅन गोंदियात आली. वाहतूक पोलीस विभागाने या टोविंग व्हॅनचा वापर करून १०६ वाहने उचलून नेली आहेत. त्यात ३५ कार व ७१ दुचाकींचा समावेश आहे. टोर्इंग व्हॅनने उचललेल्या वाहनांवर मोटारवाहन कायद्यान्वये चलान करून आतापर्यंत प्रत्येक वाहनांवर चालकाकडून १०० रूपये दंड वसूल केला जात होता. परंतु आता टोविंगव्हॅनने उचललेल्या वाहनांवर दंड मोठ्या प्रमाणात वसूल केला जाईल. (तालुका प्रतिनिधी)
दुचाकीला १०० तर कारला ४०० रुपये दंड
टोविंग व्हॅनने उचललेल्या वाहनांवर किती दंड आकारावा यासाठी १२ सप्टेंबर २०१४ रोजी पोलीस उपअधीक्षक (गृह) यांनी दंडाची रक्कम ठरविली. मोटारवाहन कायदा १९८८ चे कलम १२७ च्या अधिन राहून हा दंड वसुल करण्याचे सूचविले. परंतु या दरानुसार आतापर्यंत कारवाई करण्यात आली नाही. ट्रक, ट्रेलर व टँकर या वाहनांना १००० रूपये दंड, टेम्पो ५०० रूपये, कार व जीप यांना ४०० रूपये तर दुचाकीला १०० रूपये दंड करण्याचे सूचविण्यात आले आहे.
पावतीच छापली नाही
टोविंग व्हॅनने उचललेल्या वाहनांवर दंड आकारण्यासाठी वेगळी पावती बनविण्याचे पोलिस अधीक्षकांनी ठरविले. परंतु टोविंग व्हॅनसाठी वेगळी पावती पोलीस अधीक्षकांनी आतापर्यंत उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे वाहनांवर दुसऱ्या पावतीने दंड आकारण्यात येत आहे हे विशेष.