अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; ११ लाखांचे भेसळयुक्त साहित्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 04:52 PM2022-10-22T16:52:35+5:302022-10-22T16:56:08+5:30

भेसळयुक्त तिखट व गंजलेल्या टिनमध्ये आढळले दही

adulterated food product worth about 11 lakhs seized in gondia action by food and drug administration | अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; ११ लाखांचे भेसळयुक्त साहित्य जप्त

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; ११ लाखांचे भेसळयुक्त साहित्य जप्त

Next

गोंदिया : शहरातील विविध पाच प्रतिष्ठानांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळप्रकरणी धडक मोहीम राबवत तब्बल ११ लाख ११ हजार ८०० रुपयांचा भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.

शहरातील बावनथडे खोवा विक्री केंद्र, प्रभू कोल्ड स्टोअरेज, आमगाव रोड, गोंदिया, शामसुंदर डेअरी, आयुष्य ट्रेडर्स आणि सुनील ऑइल मिल, माता टोली या पाच प्रतिष्ठानांवर ही कारवाई करण्यात आली. सणासुदीच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल, वनस्पती, खवा, मावा, रवा, मैदा, बेसन आदी अन्नपदार्थांचा मिठाई, नमकिन तयार करण्यासाठी वापर करण्यात येतो. जिल्ह्यातील जनतेला सकस व भेसळमुक्त अन्न मिळण्याकरिता अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे सणासुदीच्या दिवसात उत्पादक, रिपॅकर, घाऊक विक्रेते, स्वीट मार्ट यांच्या तपासणीची मोहीम राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यात खुले खाद्यतेल विक्रेते, खाद्यतेल पॅकिंग करत टिनच्या डब्यांचा पुनर्वापर करणारे आदींवर जप्ती धाडी टाकून १,१९८ किलो किंमत १ लाख ६६ हजार १२२ रुपये किमतीचे तेल भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला आहे. दही गंजलेल्या टिनमध्ये साठवून ठेवल्याचे आढळले. त्यामुळे कमी दर्जा असल्याच्या संशयावरून तसेच गंजलेल्या टिनमध्ये साठवणूक केल्यामुळे दही या अन्नपदार्थाचा १,६७६ किलो किंमत ६६ हजार ६४० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

कोल्ड स्टोअरेज आस्थापनेवर धाड टाकून तेथे साठवणूक केलेला विना लेबलचा गरम मसाला व लाल तिखट या अन्नपदार्थांचा दर्जा कमी असल्याच्या संशयावरून व खुल्या स्वरुपात असल्याने साठा जप्त करण्यात आला. गरम मसाला व लाल तिखट या अन्नपदार्थांचा एकूण वजन ४,८४६ किलो किंमत ११ लाख १ हजार २८० रूपये इतका साठा जप्त करण्यात आला.

सणासुदीच्या दिवसांचा विचार करता, खाद्यपदार्थांमध्ये भेसळीची शक्यता नाकारता येत नाही. सणासुदीच्या दिवसात ग्राहकांचा खाद्यपदार्थ, मिठाई खरेदी करण्याकडे जास्त कल असतो. तो विचारात घेता अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे. खुल्या खाद्यतेलाची विक्री करण्यास कायद्यानुसार मनाई आहे, तरीही सुटे खाद्यतेल विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी विनालेबलच्या व विनापॅकिंगच्या खाद्यतेलाची विक्री करू नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त ए. पी. देशपांडे यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी शीतल देशपांडे, भास्कर नंदनवार व इतरांनी केली.

४२ नमुने घेतले

गोंदिया जिल्ह्यामध्ये सणासुदीच्या दिवसात खोवा, मावाचे २ नमुने, मिठाईचे १३ नमुने, खाद्यतेलाचे ५ नमुने, रवा, बेसन, दही, मैदा या अन्नपदार्थांचे २२ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

बेस्ट युज डेटची खातरजमा करा

ग्राहकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना अन्नपदार्थाची उत्पादन तिथी व बेस्ट युज डेट याबाबत खातरजमा करूनच योग्य गुणवत्तेचे अन्नपदार्थ खरेदी करावेत. ग्राहकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत काही तक्रार असल्यास ती प्रशासनाचा ई-मेल acfoodbhandara@gmail.com तसेच टोल फ्री क्रमांक १-८८८-४६३ -६३३२ वर करावी.

- ए. पी. देशपांडे, सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, गोंदिया

Web Title: adulterated food product worth about 11 lakhs seized in gondia action by food and drug administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.