नरेश रहिलेगोंदिया: होळीच्या पूर्व संध्येला आमगाव तालुक्यातील ग्राम सावंगी येथील एका युवकाचा गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना गुरूवारी (दि.१३) सकाळी ७ वाजता उघडकीस आली. विशेष म्हणजे, घटनास्थळापासून काही अंतरावर दारू व पाण्याच्या बॉटल्स मिळून आल्या आहेत. यावरून दारूच्या नशेत भांडणातून खून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नरेश लालचंद चौधरी (३५, रा. सावंगी) असे मृताचे नाव आहे. अनैतिक संबधातून सावंगी येथील नरेश चौधरीचा खुन करणाऱ्या आरोपीला अवघ्या तीन तासात अटक करण्यात आली आहे. अनैतिक संबधातून हा खून झाल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. परंतु अनैतिक संबध कोणाचे ही बाब पोलिसांनी स्पष्ट केली नाही.
आमगाव तालुक्यातील ग्राम पदमपूर येथील सावंगी मार्गावरील शेतात गुरूवारी (दि.१३) सकाळी ७ वाजता शेतकऱ्यांना शेतात एक दुचाकी व तिच्या बाजूला एक व्यक्ती पडलेला दिसला. सुरूवातीला लोकांना कुणी दारू पिऊन शेतात झोपला असावा असे वाटले व त्यामुळे त्यांनी लक्ष दिले नाही. परंतु काहींनी जवळ जाऊन बघितले असता युवक मृतावस्थेत असल्याचे त्यांना कळले. त्याचा धारदार शस्त्राने गळा चिरून त्याचा खून केल्याचे लक्षात घेताच गावकऱ्यांनी ओरडा-ओरड केली. माहिती मिळताच पदमपूर व सावंगीवासीयांनी एकच गर्दी केली. सावंगी येथील नागरिकांनी येताच मृताला ओळखून नरेश चौधरी असल्याचे सांगितले. पोलिसांना माहिती मिळताच आमगाव पोलिसाची चमू घटनास्थळी दाखल झाली. या घटनेसंदर्भात महेश्वरी नरेश चौधरी (३०) रा. सावंगी (चिचटोला) ता. सालेकसा यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम कलम १०३, (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे व आमगावचे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांना निर्देश सूचना देवुन खुनाचा गंभीर गुन्हा करणाऱ्या आरोपीचा तत्काळ शोध घेण्याचे निर्देश दिले होते. व या प्रकरणात आरोपी श्रवण हरीचंद सोनवाने (२५) रा. सावंगी ता. सालेकसा जि. गोंदिया याला दुपारी सावंगी येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
आरोपीने दिली कबुलीआरोपी श्रवण सोनवाने याला खुनाच्या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल विचारपूस चौकशी केली असता आरोपीने मृतकचा कोयत्याने खून केल्याची कबुली दिली. अनैतिक संबधातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परंतु यासंदर्भात आणखी सखोल चौकशी सुरू आहे. तपास वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तिरुपती राणे करीत आहेत.
यांनी केली कारवाईपोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज राजूरकर, महिला पोलीस उपनिरीक्षक वनिता सायकर, पोलीस उपनिरीक्षक शरद सैदाने, पोलीस हवालदार राजू मिश्रा, नेवालाल भेलावे, विठ्ठल ठाकरे, महेश मेहर, तुलसीदास लुटे, सुजित हलमारे, इंद्रजीत बिसेन, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, हंसराज भांडारकर, संतोष केदार,कुंभलवार, राम खंडारे, मुरली पांडे, आमगाव येथील पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, तांत्रिक सेलचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, अंमलदार रोशन येरणे यांनी केली आहे.
तांत्रीक विश्लेषण व भौतिक पुराव्यावरून पोहचले आरोपीपर्यंतनेमण्यात आलेल्या पोलीस पथकाने अतिशय संयमाने, बुध्दीकौशल्य, अथक परिश्रमाने खुनाच्या गुन्ह्याचे अनुषंगाने घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळा वरून प्राप्त भौतिक व परिस्थितीजन्य पुरावे, गावातील व गाव परिसरातील लोकांना विचारपूस, संशयितांची पडताळणी, तांत्रीक विश्लेषण, आणि प्राप्त माहिती वरून अत्यंत कुशलतेने आरोपीला अटक केली आहे.
नशेच्या धुंदीत केला गळा चिरून खूनआरोपींनी खून करण्यापूर्वी त्या ठिकाणी मद्यप्राशन केले असल्यामुळे विदेशी दारू व पाण्याच्या बॉटल्स आढळल्या. तसेच घटनास्थळापासून २५ ते ३० फूट अंतरावर धारदार फरसा मिळून आला असून त्याला पोलिसांनी जप्त केले आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी गळा चिरल्यानंतर घटनास्थळापासून २५ ते ३० फूट अंतरावर तो फरशा बांधीत फेकून दिला होता.
तपासासाठी चार पथक गठितनरेश चौधरीच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेने तीन पथक तर आमगाव पोलिसांकडून एक असे चार पथक गठित करण्यात आले आहे. आरोपींच्या शोध घेण्यासाठी हे पथक वेगवेगळ्या दिशेने कामाला लसागले आहेत.