लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जाणारी अक्षय्य तृतीया यंदा एका अद्वितीय योगाचा साक्षीदार ठरणार आहे. ३० एप्रिल रोजी, अक्षय्य तृतीया, तृतीयासह चतुर्थी, रोहिणी नक्षत्र आणि बुधवारचा दिवस असा दुर्मीळ संयोग साधला आहे.
गेल्या १२४ वर्षात असा योग प्रथमच आला आहे, असे ज्योतिषशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. यंदा अक्षय तृतीया तिथीला सुरू होत असताना चतुर्थीचा स्पर्शही होणार आहे. त्याचवेळी चंद्र रोहिणी नक्षत्रात भ्रमण करणार आहे आणि तोही बुधवारी, बुधग्रहाशी संबंधित शुभवार, या अद्भूत संगमामुळे यंदाची अक्षय्य तृतीया विशेष फलदायी ठरणार आहे. सुवर्ण खरेदी, नवीन कामांना आरंभ, शिक्षण, विवाह, व्यवसाय, गृहप्रवेश आदी शुभकार्यासाठी अत्यंत उत्तम मुहूर्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
१९८२ ... यावर्षी होती सोमवारी अक्षय्य तृतीया
- वैशाख मासमध्ये अक्षय्य तृतीया सोमवारी किंवा बुधवारी येणे दुर्मीळ योग मानला जातो.
- अक्षय तृतीया २६ एप्रिल १९८रमध्ये सोमवारी आली होती. त्या दिवशी तृतीयासह चतुर्थी अशी होती.
यंदा परशुराम जन्मोत्सव -अक्षय्य तृतीया वेगवेगळीदरवर्षी अक्षय्य तृतीया व परशुराम जन्मोत्सव एकाच दिवशी येत असते. मात्र, यंदा मंगळवारी भगवान परशुराम जन्मोत्सव व बुधवारी अक्षय्य तृतीया आली आहे. मागील १५ वर्षात असा योग येण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी २०१३, २०१६ व २०२० यावर्षी अक्षय्य तृतीया व भगवान परशुराम जन्मोत्सव एक दिवसाच्या फरकाने आले होते. मात्र, नेहमीप्रमाणे यंदाही अक्षय्य तृतीयेला महात्मा बसवेश्वर जयंती आली असून, ती त्याच दिवशी साजरी केली जाणार आहे.
"शास्त्रानुसार, अक्षय्य तृतीया व रोहिणी नक्षत्र सोमवारी किंवा बुधवारी आली, तर ते अत्यंत दुर्लभ मानली जाते. मागील १२४ वर्षांत असा योग आढळून आला नाही. अशा दिवशी कोणी पुण्यकर्म करतील, त्याचे फळ सहस्रकोट मिळते. यंदा अक्षय्य तृतीया बुधवारी आली आहे. पुण्य कर्मासाठी पक्ष्यांसाठी दाणापाण्याची, जनावरांसाठी चारा, पाण्याची सोय करण्यात यावी. पितरांचे श्राद्ध करावे, जलकुंभ दान करावे."- पंडित पंकज जोशी, गोंदिया