गोंदिया : २० दिवसांच्या बाळाचे घरातूनच अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम डांगोर्ली येथे सोमवारी (दि.१७) रात्री १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली असून,पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
गोंदिया तालुक्यातील डांगोर्ली येथील रहिवासी राजेंद्र रेवायी फाये (२३) यांचा प्रेमविवाह रिया राजेंद्र फाये (२२) हिच्यासोबत सन २०२४ मध्ये झाला. त्या दोघांना २० दिवसांपूर्वी पुत्ररत्न प्राप्त झाले आणि त्याचे नाव विराज ठेवण्यात आले. सोमवारी (दि.१७) रात्री जेवण करून रिया आणि राजेंद्र आपल्या खोलीत झोपायला गेले. रात्री १० वाजताच्या सुमारास रिया ही बाथरूमकरिता गेली. ती परत आल्यानंतर तिचे बाळ गायब होते. यानंतर रियाने बाळाचे अपहरण झाल्याची तक्रार रावणवाडी पोलिस स्टेशनला केली. तब्बल २१ तास उलटूनही त्या बालकाच्या पत्ता लागला नाही. या घटनेची वार्ता गावात पसरताच एकच खळबळ उडाली. पोलिस अधीक्षक गोरख भामरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन या प्रकरणाची शहानिशा केली. या घटने संदर्भात रावणवाडी पोलिसात अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांची शोध मोहीम
फाये यांच्या घरापासून काही अंतरावर वैनगंगा नदी असल्याने कुणी बाळाला नदीत तर टाकले नाही, असा संशय पोलिसांना आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नदीत शोधमोहीम सुरू केली आहे. त्या २० दिवसांच्या बाळाचा वैरी कोण? आई-वडिलांच्या वचपा काढण्यासाठी कुणी हे कृत्य तर केले नाही किंवा मुलाच्या हव्यासापाई कुणी त्याचे अपहरण तर केले नाही. तो २० दिवसांचा बाळ तब्बल २१ तासांपासून आईपासून वेगळा असून कुठे आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.
कुटुंबीयांवरच पोलिसांना संशय
रात्रीपर्यंत जेवण झाले आणि घरातील सर्वजण झोपी गेले असताना रात्री १० वाजता चिमुकला बेपत्ता होतो. ज्याला चालता-बोलता येत नाही, अशा निरागस बाळाचे अपहरण केले जाते. रात्री घरातील दारे बंद असताना बाहेरचा येऊन कुणी अपहरण करेल, ही बाब पोलिसांना पचनी पडत नसल्याने विराजचे अपहरण घरातीलच व्यक्तीने तर केले नाही ना, या दिशेने पोलिस तपास करीत आहेत. संशयाची सुई घरच्यांवर जात असल्याने हे प्रकरण लवकरच स्पष्ट होईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
Web Summary : A 20-day-old baby was abducted from his home in Gondia. Police suspect family involvement as the investigation continues, focusing on possible motives and internal connections. Search operations are ongoing.
Web Summary : गोंदिया में 20 दिन का बच्चा घर से अगवा। पुलिस को परिवार पर शक, जांच जारी, संभावित मकसद और आंतरिक संबंधों पर ध्यान केंद्रित। खोज अभियान जारी हैं।