लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील शाळांना डिजिटल करण्याचे गाजर दाखवले जात असले, तरी मूलभूत सुविधा अजूनही अपूर्णच आहेत. जिल्हा परिषदेच्या १०३८ प्राथमिक शाळांपैकी तब्बल ४९३ शाळांमध्ये संरक्षक भिंतच नाही. काही शाळांमध्ये पडलेल्या भिंती, तर काही ठिकाणी केवळ तारांचे कुंपण लावण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोना काळात शाळा बंद असताना संरक्षक भिंतीचे बांधकाम पूर्ण करता आले असते. मात्र, योजना अंमलबजावणीच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना अद्यापही असुरक्षित वातावरणात शिक्षण घ्यावे लागत आहे. गोंदिया जिल्ह्यातील अनेक शाळा अनेक तलावाच्या काठावर, डोंगराळ भागात किंवा विद्युत डीपीजवळ आहेत. यामुळे अपघाताची शक्यता अधिक आहे. शाळांमध्ये संरक्षक भिंतीच्या अभावामुळे ठिकाणी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मेंदीच्या झाडांचे कुंपण तयार करून शाळेचा परिसर सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या अशा प्रकारचे कुंपण १३२ शाळांमध्ये आहे. याशिवाय ४२ शाळांमध्ये केवळ तारांचे कुंपण, ३६ शाळांमध्ये संरक्षक भिंती पडलेल्या आहेत.
संरक्षक भिंत नाही, म्हणे शाळा डिजिटलशासनाकडून डिजिटल शिक्षणासाठी निधी न देता स्थानिक पालकांनी खिशातून पैसे काढून वर्गखोल्या डिजिटल केल्या. मात्र, संरक्षक भिंतींसाठी निधी न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे प्राण सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक शाळेला तातडीने संरक्षक भिंतीची गरज आहे. यासाठी शाळांकडून वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेने त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे.
तालुक्यातील इतक्या शाळांना संरक्षक भिंतीची गरजआमगाव तालुक्यातील ५७ शाळा, गोंदिया तालुक्यात सर्वाधिक ९८ शाळा, तिरोडा ६७, देवरी ५४, सालेकसा ४५, अर्जुनी मोरगाव ७८, गोरेगाव ४७, सडक अर्जुनी ४७ शाळांमध्ये संरक्षक भिंत नाही. ही संख्या जिल्ह्यातील निम्या शाळांची आहे.
५२९ शाळांचे मैदान सपाट करा
- जिल्ह्यातील १०३८ शाळांपैकी ५२९ शाळांच्या मैदानाचे सपाटीकरण करण्याची गरज आहे.
- शाळांच्या मैदानाचे सपाटीकरण झाले नसल्याने विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासात अडचण येते.