गोंदिया : अवैध दारू विक्रेत्यांविरोधात छेडण्यात आलेल्या मोहिमेतंर्गत तिरोडा पोलिसांनी दारूसाठी हॉटस्पॉट असलेल्या संत रविदास वॉर्डात आणखी ४ ठिकाणी धाड घालून ३ लाख ८६ हजार ८५० रुपयांचा मोहासडवा व दारू पकडली असून एक दारूभट्टी उधळून लावली आहे. शनिवारी (दि.२०) पहाटे ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या गुप्त माहितीआधारे तिरोडा पोलीस व होमगार्डचे १० विशेष वेगवेगळे पथके तयार केले. शनिवारी (दि.२०) पहाटे ५ वाजेदरम्यान पथकांनी शहरातील संत रविदास वॉर्ड येथे अवैध मोहफुलाची दारू काढणाऱ्या अड्ड्यांवर धाड टाकली. यामध्ये श्याम श्रीराम झाडे हा आपल्या घरी मजूर रोहित बाबूराव बरयिकर, संजय रामा शहारे व कुलदीप अंताराम भोयर यांच्यासोबत दारूची भट्टी लावून दारू काढताना मिळून आला. पोलिसांनी सुरू असलेली भट्टी उधळून लावली असून ३० लिटर मोहा दारू, २० प्लास्टिक पोत्यात सडवा मोहफूल असा एकूण ३८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच शीला विनोद खरोले हिच्या घरातून एक लाख ४६ हजार ८५० रुपयांचा ९१ प्लास्टिक पोत्यात १८२० किलो सडवा जप्त केला. माया प्रकाश बरेकर व सुरज प्रकाश बरेकर याच्या घरातून ८९ हजार २५० रुपये किमतीचा ५५ प्लास्टिक पोत्यात ११०० किलो सडवा मोहफूल जप्त केला. तर शकील रहीम खा पठाण याच्या घरी कंम्पाऊंडमध्ये ७० प्लास्टिक पोत्यात एकूण ठेवलेला १ लाख १२ हजार रुपये किमतीचा १४०० किलो सडवा मोहफूल व हातभट्टी साहित्य जप्त केले.