गोदिया : जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बालन्याय अधिनियम २०१५, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२, बालविवाह प्रतिबंध, बाल कामगार प्रतिबंध, दत्तक विधान, ग्राम बाल संरक्षण समितीचे कर्तव्ये, जबाबदाऱ्या, त्यांची भूमिका तसेच गावस्तरावर प्रतिबंधात्मक उपाय योजनात्मक कार्य करण्याकरिता व संरक्षित वातावरण निर्मिती करण्यासाठी विविध कायद्यांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात २६ प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या.
तालुकास्तरीय ग्राम बाल संरक्षण समितीच्या दोन सदस्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. सालेकसा येथील प्रशिक्षणाचे उद्घाटन तहसीलदार कांबळे यांच्याहस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय गणवीर, बाल विकास अधिकारी चव्हान, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर उपस्थित होते. यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गोबाडे यांनी मार्गदर्शन केले. गोरेगाव येथील प्रशिक्षणाचे उद्घाटन गटविकास अधिकारी अरुण गिरेपुंजे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी संरक्षण अधिकारी मुकेश पटले व मनीषा मोहुले होते. संचालन भागवत सूर्यवंशी व आभार मनीषा चौधरी यांनी मानले. तिरोडा येथील प्रशिक्षणाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्याहस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून गटविकास अधिकारी प्रकाश गंगापारी, विस्तार अधिकारी गौतम, पोलीस उपनिरीक्षक केंद्रे, बाल विकास प्रकल्प अधिकारी चौधरी उपस्थित होते. सडक अर्जुनी येथील प्रशिक्षणाचे उद्घाटन तहसीलदार आर. एस. खोकले यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मुकेश पटले, टेंभूर्णे, कपिल टेंभुरकर यांनी मार्गदर्शन केले. संचालन मनीषा चौधरी, तर आभार भागवत सूर्यवंशी यांनी मानले. पं. स. सभागृह अर्जुनी/मोर येथील प्रशिक्षणाचे उद्घाटन बाल विकास प्रकल्प अधिकारी किरनापुरे यांनी केले. यावेळी मनीषा मोहुर्ले यांनी मार्गदर्शन केले. संचालन पुनेश नाकाडे यांनी केले. देवरी येथील प्रशिक्षणाचे उद्घाटन खंड विकास अधिकारी चंद्रमणी मोडक यांनी केले. अतिथी बाल विकास प्रकल्प अधिकारी संतोष वरपे व सलामे उपस्थित होते. यावेळी कपिल टेंभूरकर, टेंभूर्णे यांनी मार्गदर्शन केले. संचालन मनीषा मोहुर्ले व आभार रूपेश चुडंके यांनी मानले. आमगाव येथील प्रशिक्षणाचे उद्घाटन नायब तहसीलदार ए. बी. भुरे यांनी केले. बाल विकास प्रकल्प अधिकारी पी. एन. मानकर उपस्थित होते. यावेळी संरक्षण अधिकारी मुकेश पटले यांनी मार्गदर्शन केले. संचालन मनीषा चौधरी, तर आभार भागवत सूर्यवंशी यांनी मानले. जिल्ह्यातील ७ तालुक्यांमध्ये एकूण २६ कार्यशाळा घेण्यात आल्या. २५ अंगणवाडी सेविका व २५ पोलीसपाटील असे एकूण ५० सदस्यांचे एका दिवसाला दोन साझ्यामध्ये एकूण १२६४ सदस्यांना प्रशिक्षण घेण्यात आले.