लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : अतिवेग, वाहतुकीचे नियम पाळण्याकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे रस्ते अपघातात वाढ होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गेल्या ११ महिन्यांत झालेल्या ३०१ रस्ते अपघातात तब्बल १५६ जण ठार, तर २३३ जण गंभीर जखमी झाल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला वाहतूक नियंत्रण पोलिस विभागाकडून दिला जात आहे.
वाहतूक नियंत्रण शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जाते. वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे व वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे काही प्रमाणात अपघाताची संख्या कमी करण्यास यश आले होते. पण, काही वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा वाढत आहे. जिल्ह्यात जानेवारी २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत एकूण ३०१ अपघात झाले आहेत. यात १५६ जण ठार झाले, तर २३३ जण गंभीर झाले आहे, तर ४८ जण किरकोळ जखमी झाले. अपघातामुळे काही जणांना अपंगत्वसुद्धा आले आहे. त्यामुळे वाहन चालविताना सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, तसेच वेगावर नियंत्रण ठेवल्यास अपघाताचे प्रमाण कमी करण्यास निश्चित मदत होईल, असा वाहतूक नियंत्रण विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे.
सर्वाधिक मृत्यू हे हेल्मेटचा वापर न केल्यानेवाहतूक नियंत्रण विभागाकडे नोंद असलेल्या अपघातातील मृतांची संख्या व अपघाताचे कारण पाहिल्यास त्यात दुचाकी चालक वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करीत नाही. यातच अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाहन चालविताना हेल्मेटचा वापर जरूर करावा. यामुळे जीवितहानी टाळण्यास निश्चित मदत होईल.
जिल्ह्यात गेल्या ११ महिन्यांत झालेले अपघात महिना अपघात मृत्यू जानेवारी १७ ०८ फेब्रुवारी १८ १२ मार्च ३० १७ एप्रिल ३३ १७ मे ३४ १५ जून ३५ १८ जुलै २९ १३ ऑगस्ट २७ १३ सप्टेंबर २१ ११ ऑक्टोबर २५ ०९ नोव्हेंबर ३२ २३ एकूण ३०१ १५६
"वाहनचालकांनी वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्टचा, तर दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा. यामुळे अपघात व जीवितहानी टाळण्यास निश्चित मदत होईल."- नागेश भास्कर, पोलिस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया