अमृतसिंगवरील हल्लाप्रकरणी युवकास अटक
By Admin | Updated: February 14, 2015 03:48 IST2015-02-14T03:45:01+5:302015-02-14T03:48:02+5:30
वाळपई, डिचोली, फोंडा, पणजी : प्राणिमित्र अमृतसिंग, गोरक्षा अभियानाचे प्रमुख हनुमंत परब व गोसेवक वासुदेव झरेकर यांच्यावर गुरुवारी रात्री

अमृतसिंगवरील हल्लाप्रकरणी युवकास अटक
वाळपई, डिचोली, फोंडा, पणजी : प्राणिमित्र अमृतसिंग, गोरक्षा अभियानाचे प्रमुख हनुमंत परब व गोसेवक वासुदेव झरेकर यांच्यावर गुरुवारी रात्री झालेल्या हल्लाप्रकरणी वाळपई पोलिसांनी इम्रान हमीद खान (३३) याला अटक केली आहे. इम्रान हा साखळीचे उपनगराध्यक्ष रियाज खान यांचा भाऊ आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्रीच बेळगाव येथे जाऊन इम्रान याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी वाळपई पोलीस निरीक्षक संजय दळवी तपास करीत आहेत.
बेळगावहून गोमांस तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याने अमृतसिंग, परब व झरेकर हे त्यासंबंधी तक्रार देण्यासाठी बेळगावला गेले होते. त्यांच्यावर पाळत ठेवून हल्ल्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ते गुरुवारी सकाळी बेळगावला गेले होते. बोगस दाखले घेऊन गोमांस तस्करी करण्यात येते, अशी तक्रार त्यांनी बेळगावात नोंदवली होती. दरम्यान, बेळगावहून परत गोव्याकडे येत असताना रात्री ९.३० वाजता चोर्लाघाटातील जांभळीकडे एक इनोव्हा कार अचानक समोर येऊन थांबली व त्यातून उतरलेल्या पाचजणांनी हनुमंत परब यांच्या ईको गाडीवर हल्ला चढवला. त्या वेळी झरेकर हे गाडी चालवत होते. हल्लेखोरांनी कारचा दरवाजा उघडून दंडुक्यांनी त्या तिघांवर प्राणघातक हल्ला केला. त्यात अमृतसिंग यांच्या डोक्याला जबर मार लागला. मागून आलेल्या एका गाडीवाल्याने त्यांना जखमी अवस्थेत साखळी इस्पितळात आणून सोडले. या हल्ल्यात अमृतसिंग यांच्या तोंडाचे हाड मोडल्याने तसेच डोळ्यात काच घुसल्याने रात्री उशिरा त्यांना गोमेकॉत हलवले. परब व झरेकर यांना साखळीतच उपचार करण्यात आले. अमृतसिंग यांची प्रकृती सध्या स्थीर असल्याची माहिती गोमेकॉतील डॉक्टरांनी दिली.
...तर अनर्थ घडला असता
हल्लेखारांची कार अचानक कार समोर येऊन उभी राहिल्याने आम्हाला सावरण्यास वेळ मिळाला नाही. बघता बघता त्यांनी आमच्या गाडीवर हल्ला चढवत आम्हला लक्ष्य केले. मात्र, त्याच वेळी मागून काही गाड्या आल्याने हल्लेखोरांनी पळ काढला, अन्यथा, त्यानी आम्हाला ठार केले असते, असे हनुमंत परब यांनी सांगितले. (प्रतिनिधी)