‘तीन महिन्यांत युवा धोरण’
By Admin | Updated: August 7, 2014 01:21 IST2014-08-07T01:20:26+5:302014-08-07T01:21:17+5:30
पणजी : युवा धोरणाचा मसुदा पुढील आठ दिवसांत जनतेची मते मागविण्यासाठी खुला केला जाईल व तीन-चार महिन्यांत हे धोरण निश्चित केले जाईल,

‘तीन महिन्यांत युवा धोरण’
पणजी : युवा धोरणाचा मसुदा पुढील आठ दिवसांत जनतेची मते मागविण्यासाठी खुला केला जाईल व तीन-चार महिन्यांत हे धोरण निश्चित केले जाईल, अशी घोषणा क्रीडा व युवा व्यवहारमंत्री रमेश तवडकर यांनी विधानसभेत केली.
क्रीडा खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी पायाभूत सुविधा उभी करण्याची तयारी सरकारने चालवली आहे. फुटबॉल हॉकी, टेनिस स्टेडियमसह सुसज्ज स्विमिंग पूल बांधला जाईल व इनडोअर जिमनॅस्टिक स्टेडियमही होईल, असे तवडकर यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी किमान २५ सुविधा उभारल्या जातील, असे तवडकर म्हणाले.
ल्युसोफोनियाचा प्रत्येक व्यवहार पारदर्शक असून प्रत्येक बाबतीत रितसर निविदा काढूनच व्यवहार झालेले आहेत, असा दावा त्यांनी केला. १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा जो आरोप केला जातो, तो त्यांनी फेटाळून लावला. उलट पूर्व सरकारने केंद्राकडून आलेल्या निधीत ७३ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला.
गेल्या वर्षी क्रीडा संघटनांना १ कोटी ४४ लाख रुपये स्पर्धा योजनांसाठी दिले. २१६ क्लब सध्या कार्यरत आहेत. त्यांनाही आर्थिक साहाय्य दिलेले आहे. १५४ क्रीडा प्रशिक्षक सध्या खात्याच्या सेवेत आहेत, असे तवडकर म्हणाले.
आमदार दिगंबर कामत यांनी राज्यात पुरेशा क्रीडा सुविधा नसल्याची टीका केली. सरकारने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सुप्त गुण असलेल्या खेळाडूंना शोधून काढून त्यांना प्रोत्साहन द्या, अशी मागणी त्यांनी केली. देशाचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंसाठी काही तरी करा. त्यासाठी समिती स्थापन करून काम करणे आवश्यक आहे, याबाबत विचार करता येईल.
ल्युसोफोनिया स्टेडियमचे दर निश्चित केले नाहीत याकडे कामत यांनी लक्ष वेधले.
केपे क्रीडा संकुलाची योग्य ती देखभाल केली जात नाही, अशी टीका आमदार बाबू कवळेकर यांनी केली. खेळाडूंना दुखापत झाल्यास त्यांना अर्थसाहाय्याची कोणतीही योजना नाही, हे आमदार कायतान सिल्वा यांनी निदर्शनास आणले. खेळाडूंचा विमा उतरविला जावा, असा सल्ला त्यांनी दिला.
आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी ल्युसोफोनिया स्पर्धेसाठीच्या पदकांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याचा आरोप केला. कन्सल्टंटला ३८ लाख जास्त दिले ते का? असा सवाल त्यांनी केला. टॅक्सी महाराष्ट्रातून भाड्याने आणल्या. १०० किलोमीटरसुद्धा वापर झाला नाही. राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्यात ठपका असलेल्या संचेती नामक व्यक्तीला ल्युसोफोनिया आयोजनासाठी आणले.
(प्रतिनिधी)