युवकास १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2015 01:52 IST2015-06-05T01:52:13+5:302015-06-05T01:52:24+5:30
म्हापसा : अमली पदार्थ स्वत:जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाने राजवाडा-वेंगुर्ला येथील अटक केलेल्या श्रीपाद तांडेल या

युवकास १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा
म्हापसा : अमली पदार्थ स्वत:जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाने राजवाडा-वेंगुर्ला येथील अटक केलेल्या श्रीपाद तांडेल या युवकाला न्यायालयाने १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.
अमली द्रव्य व मानसिक विकृतीवरील औषधे यासाठी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश डेसमंड डिकॉस्टा यांनी त्याला मंगळवारी दोषी ठरवले. बुधवारी (दि. ३) त्याला शिक्षा देण्यात आली होती. १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा देताना आरोपीला १ लाख रुपयांचा अतिरिक्त दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न दिल्यास एका वर्षाची साधी कैदही न्यायालयाने त्याला दिली आहे.
अमली पदार्थविरोधी विभागाचे उपनिरीक्षक सीताकांत नाईक यांनी आरोपी तांडेल याला मोरजी येथील बसस्थानकाजवळील खंडर जंक्शनवर छापा टाकून २१ जानेवारी २०१३ रोजी अटक केली होती. ग्राहकाच्या प्रतीक्षेत असताना ही कारवाई विभागाने केली होती.
या वेळी त्याच्याकडून १ लाख ५५ हजार रुपये किमतीचे १.०२६ किलो चरस ताब्यात घेतले होते. तसेच त्याच्याकडून १३० रुपये, मोबाईल फोन आणि त्याचे ओळखपत्रही ताब्यात घेतले होते. मूळ बिरामदेवी देवस्थान राजवाडा, वेंर्गुला येथील हा आरोपी घटनास्थळी चरस विकण्यास येणार, अशी माहिती विभागाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.
विभागाने नंतर त्याच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यावर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. सरकारच्या वतीने सरकारी वकील अनुराधा तळावलीकर यांनी न्यायालयात बाजू मांडली.
(खास प्रतिनिधी)