सरकारच्या लेखी खाण प्रश्न संपला...
By Admin | Updated: January 2, 2015 01:11 IST2015-01-02T01:05:42+5:302015-01-02T01:11:25+5:30
फाईलमध्ये सोयीस्कर नोटिंग

सरकारच्या लेखी खाण प्रश्न संपला...
पणजी : सरकारला एखादा प्रस्ताव जर संमत करायचा झाला व एखाद्या ठिकाणी पैसा खर्च करायचा झाला, तर फाईलमध्ये सोयीस्कर असे नोटिंग घातले जाते व सर्वांकडून ते संमतही केले जाते. राज्यातील खाण प्रश्न संपलेला नसतानाही व राज्याची आर्थिक स्थिती मुळीच सुधारलेली नसतानाही सरकारने एका फाईलमधील नोटिंगमध्ये मात्र आता खाणप्रश्न संपला असल्याचे व आता पुरेसा निधी उपलब्ध होईल, असे निरीक्षण नोंदविले असल्याचे आढळून आले आहे.
फाईलमधील नोटिंगची एक प्रत ‘लोकमत’ला प्राप्त झाली आहे. त्यावरून सरकार आपल्याला वाटते तेव्हा सोयीस्कर अर्थ कसा काढते, हे स्पष्ट होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने खाणबंदी उठविली तरी राज्य सरकारने अजूनही बंदी आदेश मागे घेतलेला नाही. अद्याप एक देखील खनिज खाण सुरू झालेली नाही व राज्याची आर्थिक स्थितीही सुधारलेली नाही. मात्र, २२ मे २०१४ रोजी वन खात्याकडून सरकारमधील विविध स्तरांवर जो नोट पाठविला गेला, तो वाचण्यासारखा आहे.
नोव्हेंबरमध्ये राज्यात वन क्रीडा मेळावा पार पडला. केंद्र सरकारकडून त्यासाठी अनुदान मिळाले होते. तथापि, काही पैसे राज्य सरकारनेही मंजूर करणे गरजेचे होते. त्यामुळे त्यावेळचे प्रधान मुख्य वनपाल रिचर्ड डिसोझा यांनी वन सचिवांमार्फत त्यावेळचे मुख्यमंत्री व इतरांना एक नोट पाठविला. मायनिंग प्रश्नावर तोडगा निघाला असून आता राज्य सरकारकडे पुरेसा निधीही उपलब्ध होईल. त्यामुळे क्रीडा मेळावा आयोजित करण्यासाठी आपल्याला मंजुरी दिली जावी, असे नोटमध्ये म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ही गोष्ट मान्य करून मंजुरीही दिल्याचे फाईलवरील शेऱ्यावरून स्पष्ट होते. प्रधान वन सचिव व इतरांनीही ही फाईल मंजूर केली.
प्रत्यक्षात न्यायालयीन बंदी उठली तरी खाणप्रश्न तसाच असून, सरकारची आर्थिक स्थितीही पूर्वीसारखीच बिकट आहे.
(खास प्रतिनिधी)