लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगाव : आरोग्य, शिक्षणाबरोबर मानसिक आरोग्याचे संतुलन राखून संस्कारमय शिक्षण देण्याचे कार्य हेडगेवार स्कूल करत आहे. हेडगेवारमध्ये शिक्षण घेणारी मुले ही फक्त उच्च गुण घेणारी नसतात तर गुणांबरोबरच ती शरीराने व मानसिकदृष्ट्या कणखर असतात. यासाठी हेडगेवार संस्था व त्यांचे शिक्षकवर्ग मोलाची भूमिका बजावतात, हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
वाळपईमध्ये हेडगेवार स्कूलने गो आश्रममध्ये दहीहंडी कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हेडगेवार स्कूलचे डॉ. अशोक आमशेकर, प्रकाश गाडगीळ, सुदेश कवळेकर, गो आश्रमाचे हनुमंत परब, मुख्याध्यापिका नीलांगी शिंदे, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रीकृष्ण पूजन, गोमाता पूजन, तसेच नूतन सभागृहाचे उद्घाटन, वृक्षारोपण, आदी कार्यक्रम संपन्न झाले. मोठ्या संख्येने पालक, शिक्षक, गो प्रेमी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती. डॉ. अशोक आमशेकर यांनी प्रास्ताविक, तर सूत्रसंचालन दीप्ती चिमूलकर यांनी केले. आभार पालक शिक्षक संघाचे चंदन गावस यांनी मानले.
चार वर्षांतील भरारी कौतुकास्पद
चार वर्षांमध्ये हेडगेवार स्कूल वाळपई यांनी घेतलेली भरारी निश्चितच कौतुकास्पद आहे. गोव्यातील ग्रामीण भागातून शिक्षण घेणारा विद्यार्थी परदेशात सुद्धा चमकत आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनी शोध प्रवृत्ती, नवनिर्मिती व तंत्रज्ञान यांची कास धरावी व उच्च शिक्षण घ्यावे यासाठी हेडगेवारसारख्या संस्था सक्षम आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी अशा शाळांची नितांत आवश्यकता आहे. अशा शाळांमुळेच होतकरू विद्यार्थी तयार होऊन राज्यासह देशाचे नावलौकिक करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. दरम्यान, हनुमंत परब यांनी गो आश्रमाच्या कार्यासंबंधी सविस्त माहिती दिली.