महिला पोलिसांची फ्री स्टाईल हाणामारी
By Admin | Updated: September 30, 2014 01:14 IST2014-09-30T01:12:37+5:302014-09-30T01:14:43+5:30
पणजी : महिला संशयिताला तुरुंगात सोडायला गेलेल्या महिला पोलिसांनी आपसातच फ्री स्टाईल फायटिंग करण्याचा प्रकार येथे घडला.

महिला पोलिसांची फ्री स्टाईल हाणामारी
पणजी : महिला संशयिताला तुरुंगात सोडायला गेलेल्या महिला पोलिसांनी आपसातच फ्री स्टाईल फायटिंग करण्याचा प्रकार येथे घडला. या प्रकारणी तक्रारही नोंदविण्यात आली आहे.
ही घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. वास्को एस्कॉर्ट विभागाची एक हेड कॉन्स्टेबल आणि ३ भारतीय राखीव बटालियनच्या कॉन्स्टेबल या एका आरोपीला मडगाव येथील न्यायालयातून वास्को येथील सडा तुरुंगात घेऊन जात असताना वाटेवर हा प्रकार घडला. सर्व चारही महिला पोलिसांचे कडाक्याचे भांडण झाले. वादावादी व शिवीगाळीतून सुरू झालेला प्रकार हातघाई व मारामारीपर्यंत पोहोचला. एस्कॉर्ट विभागाच्या महिला हेडकॉन्स्टेबलने एका आयआरबी महिला कॉन्स्टेबलच्या पोटावर लाथ मारली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भांडणाची सुरुवात आरोपीला सडा जेलमधून न्यायालयात घेऊन जातेवेळीच झाली होती. आरोपीच्या समक्ष बाचाबाची व शिवीगाळ झाली होती. शाब्दिक स्वरूपात असलेल्या या भांडणाने न्यायालयातून तुरुंगाकडे जाताना वाटेवर आक्रमक स्वरूप घेतले व फ्री स्टाईल फायटिंग घडली.
दरम्यान, आयआरबीच्या कॉन्स्टेबलकडून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्यानंतर यासंबंधी तक्रार नोंदविण्यात आली. त्या अधिकाऱ्याने एस्कॉर्ट विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती; परंतु अद्याप या प्रकरणी कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.