अतिक्रमणांचा महापूर कोण रोखणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2025 12:10 IST2025-01-28T12:10:34+5:302025-01-28T12:10:54+5:30
थेट लाकडी पलंग, खुर्चा पाण्यापर्यंत घालण्याची मजल व्यावसायिकांची पोचली आहे.

अतिक्रमणांचा महापूर कोण रोखणार?
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : हरमल समुद्रकिनारी भागात मोठ्या प्रमाणात रॉक व्यावसायिक, रिसॉर्ट मालकांकडून मोठ्या प्रमाणात किनारी भागात लाकडी पलंग, खुर्चा, टेबल मांडून अतिक्रमण केले जाते.
थेट लाकडी पलंग, खुर्चा पाण्यापर्यंत घालण्याची मजल व्यावसायिकांची पोचली आहे. यातून किनाऱ्यावर चालताना पर्यटकांना अडथळे निर्माण होतात. जर कोणी विचारणा केली तर हातघाईचा प्रसंग उद्भवतो. प्रजासत्ताकदिनी, अमर बांदेकरचा झालेला मृत्यू किनाऱ्यावरील गैरप्रकार अधोरेखित करतो आहे. पर्यटन खाते पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवते.
मांद्रे मतदारसंघातील मोरजी, अश्वे, मांद्रे, हरमल, केरी या किनाऱ्यांवर स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्य देण्यासाठी सरकारी जागेत शॅक उभारण्यास परवाने दिले जातात. परंतु काहीजण स्थानिक स्वतःच्या नावावर परवाने घेतात आणि बिगर गोमंतकीयांना लाखोच्या मोबदल्यात भाडेपट्टीवर देतात. दरम्यान, अमर बांदेकर यांच्या खून प्रकरणी जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी, बांदेकर कुटुंबीयांना न्याय द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
अतिक्रमणे करणाऱ्यांवर कारवाई करा
अतिक्रमण करणाऱ्या किनाऱ्यावरील व्यावसायिकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक माजी पंच प्रवीण वायंगणकर, व्यावसायिक प्रमेश मयेकर यांनी केली आहे. ते म्हणाले की, किनारी भागात आणि पर्यायाने मांद्रे मतदारसंघात किनाऱ्यांवर रॉक, खाजगी जमिनींमध्ये रिसॉर्ट आहेत. ते लाकडी पलंग मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर घालून अतिक्रमण करत असतात. हरमल किनारी हेच चित्र दिसते. किनाऱ्यावर पर्यटकांना व्यवस्थित फिरताही येत नाही.
नियमांचे उल्लंघन
पर्यटन खाते रॉक व्यवसायासाठी स्थानिकांना परवाने देते. अनेक नियम, अटी असतात. परंतु त्याचे उल्लंघन केले जाते. पंधरा दिवसांपूर्वी मांद्रे मतदारसंघातील रॉक्स, हॉटेल्स व्यावसायिकांची महत्त्वाची बैठक मांद्रे पोलिस निरीक्षक शेरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. त्यातील निर्णयांचे काय झाले असा प्रश्न आहे.