लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राजधानी पणजीतील रस्ते कधी खड्डेमुक्त होणार? या चिंतेने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. उन्हाळ्यात स्मार्ट सिटीच्या कामासाठी रस्ते फोडण्यात आले तर पावसाळ्यात दुरुस्ती अभावी सर्वत्र खड्डेच-खड्डे पडल्याने पणजीवासीय बेजार झाले आहेत.
ऐन चतुर्थीच्या काळात पणजीत सर्व रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली. अनेकांना या खड्यातून लाडक्या गणरायाची विसर्जन मिरवणूक काढावी लागली. गेल्या वर्षीही अशीच परिस्थिती होती. चतुर्थीपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविले जाणार, असे प्रशासनाने सांगितले होते. परंतु, परिस्थिती जैसे थेच.
या खड्यांविषयी पणजीचे आमदार मंत्री बाबूश मोन्सेरात यांनीही आपण सार्वजिनक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. लवकरच राजधानी पणजीतील रस्त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती केले जाईल, असे आश्वासन मंत्री कामत यांनी दिले आहे.
पणजीत स्मार्ट सिटीच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे आणि अजुनही तो सुरूच आहे. मात्र, साधे रस्तेही व्यवस्थित रस्ते करण्यात आलेले नाहीत. पावसाळ्यापूर्वी यातील काही रस्त्यावर हॉटमिक्स घातले होते. पण एकाच पावसात ते वाहून गेले. आता पुन्हा हे खड्डे काँक्रेट घालून बुजविण्याचे कामही सुरु आहे. मात्र, तेही हलक्या पावसात उघडे पडत आहेत. त्यामुळे पणजीतील रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिक चौकशीची मागणी करत आहेत.