'सनबर्न'मधून नेमके काय साध्य होणार आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2024 12:02 IST2024-12-05T12:02:24+5:302024-12-05T12:02:24+5:30

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोव्यातले पारंपरिक कार्यक्रम, गोव्याचे संगीत, गोव्याची संस्कृती दाखवणारे कार्यक्रम आपण ठेवू शकत नाही का?

what exactly is going to be achieved through sunburn festival in goa | 'सनबर्न'मधून नेमके काय साध्य होणार आहे?

'सनबर्न'मधून नेमके काय साध्य होणार आहे?

शिवाजी य. देसाई, ब्रह्मकरमळी

सनबर्न महोत्सव धारगळमध्येच होणार यावर सरकार ठाम आहे. पेडणे तालुक्यात या महोत्सवाच्या समर्थनार्थ एक गट आहे आणि विरोधात दुसरा गट आहे. २००७ सालापासून गोव्यात हा महोत्सव सुरू झाला आहे. जागतिक नकाशावर गोव्याचे पर्यटनाच्या दृष्टीने वाढत असलेले महत्त्व हे निमित्त समोर ठेवून सनबर्नचे आयोजन होते, असे म्हणण्यास हरकत नाही. परंतु २००७ सालापासून आजपर्यंत या महोत्सवामुळे गोव्याला नेमका फायदा किती आणि कसा झाला, यावर सरकार कधी बोलल्याचे आठवत नाही.

या महोत्सवाला गोव्यात सुरुवातीपासून वारंवार विरोध होताना दिसतो. धारगळला ज्या भागात हा महोत्सव करण्याचे ठरविले आहे, तिथून काही अंतरावर आयुष इस्पितळ आणि रेडकर इस्पितळ आहे. धारगळ पंचायतीच्या ग्रामसभेने सनबर्नच्या विरोधात ठराव घेतला आणि पंचायत मंडळातील पाच सदस्यांनी एकत्र येऊन सनबर्नच्या समर्थनार्थ ठराव घेतला. जे लोक या महोत्सवाला विरोध करत आहेत, त्यांना या दोन्ही ठरावांमुळे हातात आयते कोलीत सापडले आहे. सरकार कितीही मोठे असले तरी घाईघाईत आणि आपला हेका दाखवण्यासाठी चुका करतच असते. आंदोलने भावनेने यशस्वी होत नसतात. तर त्यासाठी डोके वापरावे लागते. जसे सत्तरी तालुक्याच्या जनतेने मेळावलीच्या आयआयटी लढ्यावेळी वापरले होते तसे. आंदोलन करताना हेतू प्रामाणिक असायला हवा. फक्त स्वतःमध्ये जिद्द हवी. 

अनेकजण आपल्या राजकीय फायद्यासाठी आंदोलनात सहभागी होतात. या लोकांना ओळखता आले पाहिजे. आंदोलनात टीम वर्क खूप महत्त्वाचे असते. दबावाच्या राजकारणात भल्याभल्यांना पराभूत करता येते, यावर विश्वास असायला हवा. धारगळमध्ये सन बर्न करण्याची चूक सरकारला महागात पडू शकते. वास्तविक पेडण्याच्या जनतेला सरकारने विश्वासात घेणे आवश्यक होते. जी चूक सत्तरीत मेळावलीच्या आयआयटी वेळी सरकारने केली, ती चूक आता सरकार धारगळमध्ये सन बर्न करून करत आहे, असे वाटते. जनतेला प्रत्येकवेळी गृहीत धरणे चुकीचे असते.

मुळात या सनबर्नचा नफा नेमका काय, याचे स्पष्टीकरण कुणालाच देता येत नाही. दारू गोव्यात तयार होते म्हणून आम्ही दारू किंवा बिअरच्या बाटल्या घेऊन कधी कुठच्याच संगीत रजनी कार्यक्रमाला जात नाही. काही ठराविक पव, हॉटेलमध्ये अपवाद असतो ती गोष्ट वेगळी. सनबर्नची तिकीटे सामान्य माणसाला परवडणारी नाहीत. तिथे एका टेबलासाठी लाख रुपये मोजले जातात. त्या लाख रुपयांमध्ये बरेच काही असते, ज्यामुळे डोके गरगरते. मागील काही सनबर्नमध्ये ड्रग्जचा वापर झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. 

पेडणे तालुक्यात एक कॅसिनोदेखील उभा होत आहे. या तालुक्यात देव देवतांची अनेक प्रसिद्ध आणि जागृत मंदिरे आहेत. अशा तालुक्यात सनबर्न करून नेमके सिद्ध तरी काय होणार आहे? कसला फायदा होणार आहे? विदेशी पर्यटकांना गोव्यात आकर्षित करण्यासाठी विदेशी संगीत रजनी? वास्तविक या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोव्यातले पारंपरिक कार्यक्रम, गोव्यातले संगीत, गोव्याची संस्कृती दाखवणारे कार्यक्रम आपण ठेवू शकत नाही का? गोव्याच्या बीचवर जाऊन पहा. आपल्याला काय दिसते? बहुतेक किनाऱ्यांवर रात्रीच्यावेळी कर्णकर्कश विदेशी संगीत वाजत असते. अहो गोवा कुणाचा? आमचाच ना? जरा युरोपियन देशांमध्ये जाऊन पहा. तिथे बघा. ते लोक आपल्याला आमचे संगीत ऐकवतात का? किंवा आमच्या संगीताचा किंवा आमची संगीत रजनी ते लोक स्वतःहून ठेवतात का? विचार करा या गोष्टीचा? संगीताला वास्तविक कुठला धर्म लागत नाही. संगीत हे संगीत असते. ती एक कला आहे. तिच्याकडे कला म्हणूनच पाहिले पाहिजे. 

आपले भारतीय जे विदेशात राहतात, ते अनेकदा आपल्या भारतीय संस्कृतीचे कार्यक्रम विदेशात आयोजित करतात. विदेशी लोक स्वतः भारतीय संस्कृतीचा, भारतीय संगीताचा कार्यक्रम त्यांच्या देशात करतात का? आपण अनेक गोष्टी डोके वापरल्याशिवाय करतो. सरकारला जर विदेशी लोकांकडून गंगाजळी वाढवायची असेल, तर मर्यादेत राहून अनेक कार्यक्रम चांगल्या प्रकारे करता येतात. गोव्याच्या बीचवर गोव्याची संस्कृती दाखवणारे, अध्यात्माशी सांगड घालणारे कार्यक्रम आपण करू शकतो. त्यासाठी एक धोरण हवे. 

विदेशी लोक गोव्याच्या किनारपट्टीवर येऊन योगादेखील करतात. आपण अनेक चांगल्या गोष्टींतून विदेशी पर्यटकांकडून गंगाजळी उपलब्ध करू शकतो. फक्त गरज आहे ती मानसिकता बदलण्याची. सन बर्नमधून नेमके काय साध्य होणार आहे, हे सरकारलाच ठाऊक!

 

Web Title: what exactly is going to be achieved through sunburn festival in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.