उद्धव ठाकरे यांचे किरणपाणी येथे स्वागत
By Admin | Updated: November 24, 2014 01:28 IST2014-11-24T01:26:19+5:302014-11-24T01:28:53+5:30
पेडणे : शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे रविवारी सायंकाळी किरणपाणी पुलावर गोव्यातील शिवसैनिकांनी भव्य स्वागत केले.

उद्धव ठाकरे यांचे किरणपाणी येथे स्वागत
पेडणे : शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे रविवारी सायंकाळी किरणपाणी पुलावर गोव्यातील शिवसैनिकांनी भव्य स्वागत केले. गोवा शिवसेना राज्य प्रमुख रमेश नाईक यांनी त्यांना पुष्पहार घातला. या वेळी ठाकरेंसह त्यांच्या पत्नी, सुपुत्र तसेच शिवसेना खासदार विनायक राऊत उपस्थित होते.
या वेळी पत्रकारांनी त्यांना महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत सामील होणार का? असा प्रश्न केला असता ते फक्त हसले. मात्र, त्यांनी उत्तर देणं टाळलं. तसेच गोव्याबाबत ते म्हणाले, ज्या कोकणाने भरभरून
माझ्यावर प्रेम केले, त्याचाच गोवा एक भाग आहे. त्यातच महाराष्ट्रात व गोव्यात भाजपासारख्या
समविचारी पक्षाचे सरकार असल्याने ‘एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ याची प्रचीती येईलच, असे ते म्हणाले.
शनिवार व रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या ठाकरे कुटुंबीयांनी आरोंदा येथील देवी भद्रकालीचे दर्शन घेतल्यानंतर मुंबईकडे रवाना होताना किरणपाणी पुलावर थांबलेल्या शिवसैनिकांकडून स्वागत स्वीकारले. ठाकरे कुटुंबीय किरणपाणी येथे आल्यानंतर केवळ गाडीतून उतरून त्यांनी गोवा शिवसेना प्रमुखांकडून पुष्पहार स्वीकारून दाबोळीकडे रवाना झाले.
या वेळी गोवा शिवसेना संपर्क प्रमुख शशिकांत पर्येकर, दक्षिण गोवा संपर्क प्रमुख धनराज नाईक, ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख प्रसाद दळवी, केपे तालुका शिवसेना प्रमुख संदीप शिरवईकर, बार्देस तालुका प्रमुख राजेश पाटील, सांगे तालुका प्रमुख इनेश कासार्डेकर, म्हापसा शहर प्रमुख नरेंद्र मोरजकर, सांगे शहर प्रमुख शैलेश नाईक, मांद्रे शाखा प्रमुख रसिक म्हामल, संतोष कापडी, दिनेश गावकर, अॅड. नामदेव चोडणकर, अॅड. कृष्णा नाईक, केरीचे पंच आनंद शिरगावकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
दरम्यान, आरोंदा जेटीमुळे इथल्या रेती व्यवसायावर गंडांतर येणार असल्याने या जेटीला आमचा विरोध असल्याचे पालयेचे सरपंच बाबनी आरोलकर व तुळशीदास गवंडी यांनी गोवा शिवसेना प्रमुख रमेश नाईक यांना सांगितले.
आपली बाजू शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडण्याची मागणी या वेळी केली असता नाईक यांनी सांगितले, की गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी आपल्या भागाचे आमदार प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर आहेत व महाराष्ट्रात तसेच देशात भाजपाची सत्ता आहे.
त्यामुळे आपण हा प्रश्न गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मांडू.
(प्रतिनिधी)