लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : कळंगुट मतदारसंघात आमदार मायकल लोबो यांचे कार्य अत्यंत चांगले आहे. त्यांच्या कार्याची दखल पक्षश्रेष्ठींनीही घेतली आहे. त्यांच्या कार्याची पोचपावती त्यांना योग्य वेळी देण्यात येईल' अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. कळंगुट येथे भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार मायकल लोबो, भाजप मंडळ अध्यक्ष समीर चोडणकर, रूपेश कामत उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'आमचे सरकार जाती, धर्माचा विचार न करता लोकांचे हित पाहून विकासकामे करीत आहे. त्या कामाच्या आधारावर मतदारांनी २०१२ पासून सतत भाजपचे सरकार निवडून दिले आहे.
म्हणून काँग्रेसचा पराभव
मुख्यमंत्री म्हणाले की, 'मागील १० वर्षात राज्याचा जो विकास झाला आहे, तो पूर्वी झाला नव्हता. राज्याचा देशाचा विकास भाजपच सरकार करू शकते, हे लोकांना कळून चुकल्याने लोकांना काँग्रेस पक्षाचा विसर पडू लागला आहे. याच कारणास्तव देशातील अनेक राज्यांत काँग्रेसचा पराभव होत आहे.
यावेळी कळंगुट येथील मंडल तसेच बूथ समितीचे त्यांनी अभिनंदन केले. त्यांनी काम सुरूच ठेवण्याची विनंती त्यांनी केली. याच कार्यकर्त्यांच्या जोरावर २०२७ साली पुन्हा एकदा भाजपा सरकार सत्तेवर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी दामू नाईक, आमदार मायकल लोबो यांनीही आपले विचार मांडले.
लोबोंना राज्याची चिंता
मुख्यमंत्री म्हणाले की, 'लोबो यांनी राज्याची अधिक चिंता आहे. त्यामुळे ते राज्याच्या हिताचा अनेक वेळा विचार करतात. त्यांचा विचार योग्य असतो. विकासकामे करण्यासाठी मायकल लोबोंचा हात कोणीच धरु शकत नाही. त्यांचे मतदारसंघातील नियोजन अत्यंत चांगले आहे, असे ते म्हणाले.
मतदारसंघाचा विकास
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, आमदार मायकल लोबो यांनी मतदारसंघाचा सतत विकास साधला आहे. इतर मतदारसंघांच्या तुलनेत कळंगुटाचा विकास अत्यंत जलद गतीने होत आहे. मानवविकासाच्या क्षेत्रात लोबो आपल्या मतदारांची चांगली काळजी घेत आहे. सामान्य लोकांचे हित जपण्याचे कार्य करीत असतो.