मुरगावातील विकास कामे मार्गी लावू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2025 10:45 IST2025-01-15T10:45:20+5:302025-01-15T10:45:38+5:30
या बैठकीत मुख्यमंत्री सावंत यांनी मुरगाव विभागातील २० खाटांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत चर्चा केली.

मुरगावातील विकास कामे मार्गी लावू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर व इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुरगाव मतदारसंघाच्या विविध विकासांबाबत बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुरगाव मतदारसंघातील प्रस्तावित कामांवर चर्चा झाली. या मतदारसंघातील सुरू असलेल्या कामांचा आढावाही घेतला. राज्य सरकार राज्यातील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या कटिबद्धतेवर ठाम असल्याचेही मुख्यमंत्री सावंत यांनी बैठकीत नमूद केले.
या बैठकीत मुख्यमंत्री सावंत यांनी मुरगाव विभागातील २० खाटांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत चर्चा केली. त्यानंतर पुरातत्त्व विभागामार्फत मुरगाव किल्ल्याच्या नूतनीकरण कामाचा मुद्दाही या बैठकीत पुढे आला. हेडलैंड सडा येथील रोझ सर्कल मैदानाशी संबंधित कामे क्रीडा व युवक संचालनालयामार्फत लवकरच केली जातील. हेडलैंड सडा येथील गोवा पुनर्वसन मंडळ वसाहतीमधील विविध समस्यांसह गोवा पुनर्वसन मंडळाच्या मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत बायणा आणि डेस्टेरो भागातील मच्छीमारांसाठीच्या सुविधांशी संबंधित विविध कामांवर चर्चा करण्यात आली.
'तो' मार्ग लवकर खुला होईल
मुरगाव बंदराला जोडणाऱ्या महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. पुढील काही दिवसात त्याचे उदघाटन होणार आहे. हा मार्ग खुला होताच मतदारसंघातून होणारी अवजड वाहतूक बंद होईल, असे यावेळी सांगण्यात आले.
मुख्यमंत्री सावंत यांनी या बैठकीत मुरगाव परिसरातील पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध पर्यटन प्रकल्पांबाबत चर्चा केली. गोवा पर्यटन विकास महामंडळाअंतर्गत हे प्रकल्प विकसित केले जाणार आहेत. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम आणि जलस्रोत विभागांतर्गत काही महत्त्वाची सार्वजनिक कामे नजीकच्या काळात सुरू होतील. - संकल्प आमोणकर, आमदार, मुरगाव