लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : भारतीय जनता पक्ष हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २७ वर्षानंतर दिल्लीचे तक्त काबीज करून भाजपने देशात आपले स्थान अजून बळकट केले आहे. राज्यातील २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे ३० आमदार निवडून आणणार, असा संकल्प प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी केला.
प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच नाईक यांनी साखळी भाजप कार्यालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी साखळी मतदारसंघ भाजपतर्फे मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते नाईक यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला वास्कोचे आमदार दाजी साळकर, दक्षिण गोव्याचे माजी जिल्हाध्यक्ष सर्वानंद भगत, भाजपच्या नेत्या सुलक्षणा सावंत, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, गटाध्यक्ष रामा नाईक, सरचिटणीस कालिदास गावस, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लीकर, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेवक, सरपंच, पंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार साळकर यांनी दिल्लीतील यशाबद्दल दिल्ली तसेच देशभरातील कार्यकर्ते व मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. स्वागत रामा नाईक यांनी केले. सूत्रसंचालन कालिदास गावस यांनी केले तर गोपाळ सुर्लीकर यांनी आभार मानले.
'आगामी निवडणुकीत अजून मोठी भरारी घेऊ'
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, की नाईक हे सच्चे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून गेली तीस वर्षे भाजपची सेवा करीत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यातील आगामी जिल्हा पंचायत, नगरपालिका व २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत मोठी भरारी घेण्यासाठी सज्ज होत आहे. दिल्लीत भाजपला मोठे यश प्राप्त झाल्याने गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
कार्यकर्ता हीच भाजपची ताकद आहे. त्यामुळेच आज पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला वैभवशाली दिवस पाहायला मिळत आहेत. यापुढेही भाजप कार्यकर्त्यांनी अशाचप्रकारे आपले कार्य जोमाने सुरू ठेवून प्रत्येक घरात डबल इंजिन सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी कार्यरत राहावे, असे नाईक यांनी केले.