सांगेचा सर्वंकष विकास करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2025 10:08 IST2025-01-13T10:06:05+5:302025-01-13T10:08:24+5:30
प्रलंबित प्रकल्पांची कामे वेळेवर पूर्ण होतील.

सांगेचा सर्वंकष विकास करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, खोतीगाव : 'गेल्या निवडणुकीवेळी सुभाष फळदेसाई यांना विजय मिळवता आला नव्हता. जर ते त्यावेळी निवडून आले असते, तर ग्रामीण भागातील अनेक कामे तडीस लागली असती. त्यांचा राजकीय कारकिर्दीत खंड पडल्याने विकासकामे रेंगाळली. मात्र, आताच्या त्यांच्या कार्यकाळात ही कामे पूर्ण होतील. आता सांगेचा सर्वार्थाने चांगला विकास होईल', असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. काजुघोटो, कल्ला या गावांत दिलेल्या भेटीवेळी ते बोलत होते. प्रलंबित प्रकल्पांची कामे पूर्ण करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सांगे आणि केपे या दोन तालुक्यांच्या सीमेवरील डोंगरावर असलेल्या काजूघोटो आणि कल्ला या गावांतील लोकांनी गेल्या दहा वर्षांपासून रस्त्याची मागणी केली होती. मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या पुढाकाराने यंदा या रस्त्याचे काम सुरू झाले. आतापर्यंत ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी सांगे मतदारसंघातील विविध प्रकल्पांची या दौऱ्यात पाहणी केली. ग्रामीण वैद्यकीय दवाखाना आणि रिवण येथील पंचायत इमारत, मळकर्णेतील पंचायत इमारत, दांडो येथील पूल, सांतील आरोग्य केंद्र, पाईकदेव पूल आणि मंदिर, आदींची त्यांनी पाहणी केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील मांडवी, जुवारी या नद्यांवर जेव्हा पूल उभे राहिले होते, तेव्हा जे समाधान वाटले होते, तसेच समाधान आज या गावातील रस्ता झाल्यावर वाटते. सध्या हा भाग मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत १४ किलोमीटरचा आहे. शाळकरी मुलांसाठी खास वाहतुकीची सोय केली जाईल. यासाठी शिक्षण खात्याला सूचना देऊ.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'गावात राहून जे काही व्यवसाय करता येतील, ते सुरू करा. दूर ग्रामीण भागातून शहराकडे ये-जा करून नोकरी करणे शक्य नाही. विशेष म्हणजे सर्वांनाच नोकरी मिळणेही शक्य नाही.
समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले की, 'अनेक वेळा कामे लवकर होत नाही किंवा अडकून पडतात. त्यामुळे मी स्वतः काही अधिकारी लोकांवर भडकतो, त्यावेळी माझ्याबद्दल लोक नकारात्मक रीतीने पाहातात. पण, माझा उद्देश लोकसेवा जलद व चांगली व्हावी हा असतो.' कांता वेळीप म्हणाले की, 'सरकार वन कायद्यांतर्गत कित्येकांना जमिनी देते. पण, व्याहूनही पिढ्यानपिढ्या कसत जमिनींचा विषय आजपर्यंत न्यायालयात पडून आहे. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे. प्रदीप गावकर यांनी सूत्रसंचालन केले.
गाड्या झाल्या लालेलाल
मडगाव-काणकोण राष्ट्रीय महामार्गावर पाडी येथून किस्कॉण या गावातून काजूघोटो ते कल्ला हा जो रस्ता नव्याने आता करण्यासाठी सरकारने हातात घेतलेला आहे, त्याच ओबडधोबड रस्त्याने मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताफ्यासह प्रवास केला. या ताफ्यावेळी त्यांच्या सफेद गाड्या धुळीने लालेलाल झाल्या होत्या.
सतावणूक करू नका
'या भागातील लोक पिढ्यानपिढ्या येथे वसाहत करून राहिले आहेत. या लोकांनीच हे जंगल सांभाळले आहे. त्या लोकांशी वैर करून जंगल सांभाळणे सरकारला अशक्य आहे. वन खात्याने गावातील लोकांसोबत व्यवहार करताना जंगलाच्या कायद्यावर बोट ठेवून लोकांची सतावणूक करू नये', असा सल्ला मुख्यमंत्री सावंत यांनी कार्यक्रमास उपस्थित वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिला.