पुढील पाच वर्षात गोव्यात ५० हजार कोटींचे प्रकल्प आणू - नीतीन गडकरी
By किशोर कुबल | Updated: July 12, 2024 16:21 IST2024-07-12T16:15:05+5:302024-07-12T16:21:33+5:30
ताळगांव येथील कम्युनिटी हॉलमध्ये झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीवेळी ते बोलत होते.

पुढील पाच वर्षात गोव्यात ५० हजार कोटींचे प्रकल्प आणू - नीतीन गडकरी
पणजी : गोव्याच्या विकासासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे. पुढील पाच वर्षात राज्यात ५० हजार कोटींचे प्रकल्प आणू, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतीन गडकरी यांनी जाहीर केले.
ताळगांव येथील कम्युनिटी हॉलमध्ये झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीवेळी ते बोलत होते. गडकरी म्हणाले की, देशातील पहिल्या पाच सुंदर राज्यांमध्ये गोव्याला स्थान मिळावे या दृष्टिकोनातून गोव्याचा कायापालट केला जाईल. मोठ्या प्रमाणात येथे विकासकामे केली जातील. त्यासाठी गोव्याला केवळ प्रामाणिक नेत्यांची गरज आहे.'
या बैठकीला मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे मंत्रिमंडळातील इतर मंत्री, आमदार, पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
गडकरी उपस्थित नेत्यांना उद्देशून म्हणाले की, 'तुम्ही जे काही चांगले अथवा वाईट करता त्याची संपूर्ण माहिती तुमच्या मतदारांकडे असते. राजकारण्यांचे खरे तर हे परफॉर्मन्स ऑडिटच असते. पुढील दोन वर्षात चांगले काम करा, त्यामुळे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपचे सरकार सत्तेवर येईल.
'लोकांची नाराजी जाणून घ्या'
गडकरी यांनी असा सल्ला दिला की, लोकांची सरकारबद्दल काय नाराजी आहे, हे सर्व क्षण करून जाणून घ्या. गाफील राहू नका. त्यामुळे आपले कुठे काय चुकते, हेही कळून येईल आणि त्यानुसार सुधारणा करता येतील.