'म्हादई'तील वणवा विझविण्यासाठी हेलिकॉप्टरमधून पाण्याची फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2023 21:27 IST2023-03-07T21:27:20+5:302023-03-07T21:27:34+5:30
म्हादई अभयारण्यात शनिवारी दुपारी आगीचा वणवा पेटला.

'म्हादई'तील वणवा विझविण्यासाठी हेलिकॉप्टरमधून पाण्याची फवारणी
पणजी : म्हादई अभयारण्यात पेटलेला वणवा ४८ तास उलटले तरी आटोक्यात आलेला नाही त्यामुळे अखेर आग विझवण्यासाठी नौदलाच्या हेलिकॉप्टर्सची मदत घेण्यात आली. आठ ठिकाणी अजूनही आग पेटत असल्याचे आढळून आले असून हेलिकॉप्टरमधून पाण्याचे फवारे मारुन ती विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न चालले आहेत.
वनमंत्री विश्वजित राणे यांनी यासंबंधी ट्विटमध्ये अधिक माहिती देताना असे स्पष्ट केले की, ‘ आधी डोनियर विमानाने हवाई पाहणी केली तींत आठ ठिकाणी आग पेटत असल्याचे आढळून आले. आग विझवण्यासाठी नौदलाचे हेलिकॉप्टर मागविण्यात आले. आज दुपारपासून हेलिकॉप्टरमधून पाण्याचे फवारे मारुन आग विझवण्याचे कार्य सुरु झाले.
म्हादई अभयारण्यात शनिवारी दुपारी आगीचा वणवा पेटला. काजु बागायतीत कोणीतरी आग लावली असावी व ती पसरत गेली असावी असा संशय आहे. चोर्ला घाट, साट्रे, चरावणे, ठाणे आदी भागात झपाट्याने आग फैलावली. वनमंत्री विश्वजित राणे यांनी सोमवारी चोर्ला घाटात भेट देऊन पाहणी केली. मुख्य वनपाल सौरभ कुमार यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली.
वन खात्याने पंधरा पथके तयार केली असून वन अधिकारी व कर्मचारी मिळून १५० जण आग आटोक्यात आणण्यासाठी कार्यरत आहेत. उत्तर गोवा जिल्हाधिकारीही परिस्थितीवर देखरेख ठेवून आहेत. म्हादई नदीचे पाणी कर्नाटकने वळवल्याने तसेच या नदीवर कळसा, भंडुरा येथे पाटबांधारे प्रकल्प आणू घातल्याने आधीच गोव्यातील जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यात म्हादई अभयारण्यातील या आगीबद्दल आता घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.