लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दिल्लीत गोव्याचे मंत्री विश्वजीत राणे यांच्या गाठीभेटी सुरूच आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचीही राणे यांनी भेट घेतली. दोघांमध्ये पाऊण तास गोव्यातील राजकीय स्थितीवर चर्चा झाली. बी. एल. संतोष यांनी गोव्यातील राजकीय समीकरणांचा व अधूनमधून निर्माण होणाऱ्या स्थितीचा थोडक्यात आढावा घेतला.
मंत्री विश्वजीत राणे यांनी केंद्रीय नगर व्यवहार आणि गृहनिर्माण मंत्रालयाचे मंत्री मनोहर लाल खट्टर यांचीही भेट घेतली. दोघांमध्येही विविध विषयांवर चर्चा झाली. बी. एल. संतोष यांच्यासोबतच्या बैठकीवेळी मात्र विश्वजीत यांना संतोष यांनी मार्गदर्शन केले. गोव्यात भाजपची मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी झाली आहे. एका सत्तरी तालुक्यात भाजपने पन्नास हजार सदस्य नोंदविले याविषयी संतोषजींनी समाधान व्यक्त केल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, मंत्री विश्वजीत राणे हे येत्या वर्षी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीत भेटणार आहेत. पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे याही पंतप्रधानांना भेटून येतील. तशी कल्पना पंतप्रधान कार्यालयाला देण्यात आली आहे. गुरुवारी मंत्री राणे यांनी पंतप्रधानांची भेट घेतली तेव्हा बरीच चर्चा झाली.
तीन आमदार राजस्थानला
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत तीन आमदार शुक्रवारी सायंकाळी राजस्थानला दाखल झाले. राजस्थानला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची एक बैठक आहे. त्या बैठकीत दोन दिवस मुख्यमंत्री सहभागी होतील. मुख्यमंत्र्यांसोबत आमदार जीत आरोलकर (मांदे), दाजी साळकर (वास्को) व प्रेमेंद शेटामये) हे चार्टर विमानाने राजस्थानला गेले आहेत. राजस्थानहून ते दिल्लीला जातील, अशी चर्चा राजकीय गोटात होती पण ते शनिवारी सायंकाळी राजस्थानहून गोव्यात परततील असे एका आमदाराने 'लोकमत'ला सांगितले. मंत्रिमंडळ फेररचनेचा त्यांच्या राजस्थान भेटीशी संबंध नाही. मात्र हे तिन्ही आमदार व अन्य बहुतेक आमदार व मंत्री हे मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वासोबत ठामपणे आहेत.
रोहन खंवटे गोव्यातच; तानावडेही दिल्लीहून परतले
दरम्यान, पर्यटन मंत्री रोहन खंवटे हे दिल्लीला गेले असल्याची चर्चा काल पसरली होती. पण खंवटे यांनी लोकमतला सांगितले की, आपण गोव्याबाहेर कुठेच गेलेलो नाही. मी पर्वरी मतदारसंघातच आहे आणि विविध कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी झालो. गोवा मंत्रिमंडळाची संभाव्य फेररचना किंवा आमदरांच्या दिल्लीवाऱ्या याच्याशी माझा संबंध नाही, असे खंवटे म्हणाले.
खंवटे हे गेल्या पंधरवड्यात मात्र दिल्लीला जाऊन आले आहेत. त्यानंतर चीजमंत्री सुदीन ढवळीकर हे देखील दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शहा यांना भेटले होते. गोव्यातील काही मंत्र्यांची खाती जानेवारी किवा फेब्रुवारीत बदलली जाऊ शकतात. अनेक मंत्र्यांना याची कल्पना आली आहे. खासदार व भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे हे गेले काही दिवस दिल्लीत होते. ते शुक्रवारी गोव्यात परतले.
मुख्यमंत्री पदासाठी काही नेत्यांमध्ये स्पर्धा आहे. अशी चर्चा भाजपच्या आतील गोटात सुरु आहे. या स्पर्धेत एक राज्यपाल, सभापती वगैरे असल्याचे दावे काहीजण करतात. पण त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. तानावडे हे देखील स्पर्धेत असल्याची अफवा काहीजणांनी पिकवली होती. पण तानावडे हे कोणत्याच स्पर्धेत नाहीत, असे एका नेत्याने सांगितले.