‘विक्रमादित्य’चे मोदींच्या हस्ते राष्ट्रार्पण
By Admin | Updated: June 15, 2014 01:22 IST2014-06-15T01:21:37+5:302014-06-15T01:22:04+5:30
अनिल चोडणकर ल्ल वास्को पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाची सर्वात मोठी विमानवाहू युध्दनौका आय़एऩएस़ विक्रमादित्य शनिवारी राष्ट्राला अर्पण करण्यात आली.

‘विक्रमादित्य’चे मोदींच्या हस्ते राष्ट्रार्पण
अनिल चोडणकर ल्ल वास्को
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाची सर्वात मोठी विमानवाहू युध्दनौका आय़एऩएस़ विक्रमादित्य शनिवारी राष्ट्राला अर्पण करण्यात आली. नंतर पंतप्रधानांनी या युद्धनौकेतून सफर करून त्यावरील युद्धसज्जतेची माहिती घेतली. खुद्द पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झाल्याने नौदलाचे मनोधैर्य खचितच उंचावले गेले.
संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारताने स्वयंपूर्ण होण्यावर त्यांनी भर दिला. सेनादलांमध्ये ‘एक रँक, एक पेन्शन’ योजना राबविण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच देशाच्या सुरक्षिततेसाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या युद्धवीरांचा यथोचित गौरव करण्यासाठी व त्यांच्यापासून सर्वांना स्फूर्ती मिळावी यासाठी एक भव्य ‘युद्ध स्मारक’ (वॉर मेमोरियल) उभारण्याचीही मोदी यांनी माहिती घेतली.
नवी दिल्लीहून भारतीय वायुसेनेच्या राजहंस या विमानाने आलेल्या मोदी यांचे दाबोळी येथील आय़एऩएस. हंसा नौदल तळावर हार्दिक स्वागत करण्यात आले़ त्यांच्यासमवेत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री इंद्रजित सिंग राव होते. क्रीम रंगाचा कुर्ता आणि निळे जाकीट परिधान केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी ९़४५ वाजता भारतीय वायुसेनेच्या विमानातून उतरले असता नौदलप्रमुख अॅडमिरल आऱ के.धवन आणि पश्चिम विभाग नौदल ध्वजाधिकारी व्हाईस अॅडमिरल अनिल चोप्रा यांनी त्यांचे स्वागत केले़ त्यानंतर गोव्याचे राज्यपाल भारत वीर वांच्छू व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह इतरांनी पुष्पगुच्छ देऊन पंतप्रधानांचे स्वागत केले. यानंतर त्यांना नौदलाच्या पथकांनी मानवंदना दिली. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी नौदलाच्या परिषद सभागृहात अल्पोपहार घेतला. तसेच थोडी विश्रांती घेतली. त्यानंतर नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून आय़एऩएस़ विक्रमादित्य या विमानवाहू युध्दनौकेवर ते रवाना झाले़ या वेळी त्यांच्यासमवेत केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक व मुख्यमंत्री पर्रीकरही विक्रमादित्य युध्दनौकेवर गेले़
विक्रमादित्य विमानवाहू युध्दनौका राष्ट्राला समर्पण करण्याचा सोहळा आय़एऩएस़ हंसा या युध्दनौकेवर आयोजिला होता. दाबोळीच्या आय़एऩएस़ हंसा तळावर केवळ स्वागताचा आणि नौदलाच्या मानवंदनेनंतरचे भाषणही नव्हते. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोदी यांचा देशातील हा पहिलाच दौरा. या वेळी कडक सुरक्षा होती़