नोकरीकांडापासून 'विचलित' करण्यासाठी विरोधक 'टार्गेट': विजय सरदेसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2024 12:29 IST2024-11-25T12:27:52+5:302024-11-25T12:29:36+5:30
मळकर्णेतील माझ्या फार्मवर पोलिस पाठवले

नोकरीकांडापासून 'विचलित' करण्यासाठी विरोधक 'टार्गेट': विजय सरदेसाई
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नोकरीकांड प्रकरणापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सरकार आता विरोधकांना टार्गेट करू लागले आहे, असा आरोप इंडिया युतीने केला. 'मळकर्णेतील माझ्या फार्म हाऊसवर पोलिस पाठवले,' असे विजय सरदेसाई यांनी सांगितले तर 'गेले तीन दिवस पोलिस आपल्या घरासमोर पाळत ठेवून आहेत', असा आरोप आपचे गोवा प्रमुख अॅड. अमित पालेकर यांनी केला आहे.
रविवारी पत्रकार परिषदेत सरदेसाई म्हणाले की, 'सरकारने असे कितीही प्रयोग केले तरी आम्ही घाबरणार नाही. नोकरीकांडाचा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय गप्प बसणार नाही. मळकर्णेतील माझ्या फार्मवर क्राइम ब्रांचचे पोलिस निरीक्षक किशोर रामानंद व उपनिरीक्षक मंदार परब कोणाला शोधायला गेले होते? हे स्पष्ट व्हायला हवे. अशा प्रकाराने मी घाबरणाऱ्यातला नव्हे. पर्रीकर मुख्यमंत्री असतानासुद्धा मला घाबरवू शकले नाहीत. सावंत सरकार 'विरोधकमुक्त गोवा' करू पाहत आहेत आणि म्हणूनच आमच्यामागे पोलिसांचा ससेमिरा लावलेला आहे,' असे सरदेसाई म्हणाले.
ते म्हणाले की, 'या प्रकरणातील एका आरोपीने लिहिलेले पत्र मला पुढील दोन दिवसात मिळणार आहे. ते हातात पडताच मी या विषयावर आणखी प्रकाश टाकीन. पोलिसांकडेही एक पत्र आहे, ज्यात ४७ नावे व फोन क्रमांक आहेत. ही माहिती पोलिस का उघड करत नाहीत? पोलिस या व्यक्तींकडे का जात नाहीत?' असा सवाल सरदेसाई यांनी केला.
ते सुपर पोलिस बनलेत
'पोलिसांनी आतापर्यंत ज्यांना पकडले ते मामुली मध्यस्थ आहेत. हिमनगाचे टोक साखळीत आहे. साखळीतील पोलिस निरीक्षक तुषार वेर्णेकर हे सुपर पोलिस बनलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून डीजीपी, एसपींना तुषार हेच आदेश देतात, असा आरोप पालेकर यांनी केला. ते म्हणाले की, 'नोकरीकांड प्रकरणात ज्याने आत्महत्या केली, त्या सतरकरला बरीच माहिती होती. कदाचित पोलिसांनीच त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असावे. कारण २४ तासांतच त्याने आपले जीवन संपवले. नंतर पोलिसांनी सतरकर यांच्या कुटुंबीयांना पूजाविरुद्ध तक्रार नोंदविण्यास भाग पडले. सरकारबरोबर पोलिसही या प्रकरणात सहभागी असल्याचे यावरून स्पष्ट होते.' दरम्यान, आपल्या मळकर्णे येथील फार्मवर पोलिस आले होते हे दर्शवणारे फोटोही सरदेसाई यांनी दाखवलेले आहेत.
...तर पोलिस अडचणीत येतील
सरदेसाई म्हणाले की 'विरोधकांवर नजर ठेवण्यासाठी सरकारप्रमुखाने एक कार्यालयही उघडले आहे. या कार्यालयात कोण कोण असतात, त्याचा फोटोदेखील मी लवकरच प्रसार माध्यमांना देईन. खोट्या प्रकरणात विरोधकांना अडकवण्याचे प्रयत्न चालले आहेत. आसगाव प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी कोणाच्याही दबावाखाली येऊन भलते- सलते करू नये, अन्यथा पोलिस अडचणीत येतील.'
'कॉल डिटेल्स आरोपपत्रामध्ये हवेत.'
अॅड. अमित पालेकर म्हणाले की, गेले तीन दिवस क्राइम ब्रँच अधिकारी माझ्या घराभोवती घुटमळत आहेत. मी त्यांच्याशी विचारणा केली असता पासपोर्टच्या कामानिमित्त आलो होतो, असे थातूरमातूर उत्तरे त्यांनी दिली. परंतु, मला त्यांच्या हेतूबद्दल संशय आहे. नोकरीकांड प्रकरणात पूजा नाईक हिच्या मोबाइलवरील गेल्या वर्षभरातील कॉल तपासण्याची मागणी आम्ही केली. ती फेटाळण्यात आली. दुसरीकडे विरोधकांचे कॉल डिटेल्स मात्र तपासले जात आहेत.
मागणी केलीय...
सरदेसाई यांनी आरोप केला की, 'पूजा नाईक हिच्या जामिनाला पोलिसांनी विरोध केला नाही. कारण पोलिस उपनिरीक्षकानेच पैसे देऊन स्वतः नोकरी घेतली होती. सरकारसमोर पोलिस केवळ वाकत नाही तर अक्षरशः सरपटत आहेत, हे अतिशय चिंताजनक आहे. सत्तेत असलेले बाबूश मोन्सेरात, सुदिन ढवळीकर यांच्यासारखे मंत्रीही निःपक्षपाती चौकशीची मागणी करतात त्यावरूनच बरेच काही स्पष्ट होते.
तपास योग्य दिशेने : मुख्यमंत्री सावंत
दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना नोकरीकांडाबद्दल विरोधकांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारले असता 'तपास योग्य दिशेने पुढे जात आहे,' असे एकाच वाक्यात त्यांनी उत्तर दिले. आणखी काहीही ते बोलले नाहीत.
विरोधकांचे आरोप निराधार : नरेंद्र सावईकर
भाजपचे प्रदेश सरचिटणीस अॅड. नरेंद्र सावईकर यांनी विरोधक कोणत्याही पुराव्याशिवाय खोटे आणि निराधार आरोप करत आहेत, असे म्हटले आहे. ते म्हणाले की, विरोधकांकडे आता कोणतेही मुद्दे राहिलेले नसल्याने आता सावंत सरकारवर खोटेनाटे आरोप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नोकरीच्या घोटाळ्याला व्यापम घोटाळा असे संबोधले जात आहे. पोलिस कथित घोटाळ्याचा तपास करत असून कायद्यानुसार योग्य ती पावले उचलली जात आहेत.'